अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, भाजप नेत्यांची धरपकड; अचलपूर, अकोटमध्येही संचारबंदी

0
225
संग्रहित छायाचित्र.

अमरावतीः त्रिपुरामधील हिंसाचाराच्या घटनेचे हिंसक पडसाद उमटल्यानंतर अमरावतीमध्ये चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. अमरावतीत काल घडलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान, संवेदनशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपुरात भाजप नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले असून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने चार दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील मोबाईल इंटरनेटसेवा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अमरावतीतील परिस्थितीबाबत आज माहिती दिली. अमरावतीत घडलेल्या हिंसाचारात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या हिंसाचारामागे कोणाचा हात आहे का याची चौकशी केली जाईल. त्रिपुरा घटनेवरून अमरावतीत निघालेल्या मोर्चाचीही चौकशी केली जाईल. या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती देणे योग्य ठरेल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

अचलपुरात संचारबंदी, भाजप नेते स्थानबद्धः अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर तालुक्यात आज भाजपने शहर बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदसिंह गड्रेल, अभय माथने, रुपेश लहाने, श्याम सिंह गड्रेल यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध केले आहे. स्थानबद्ध केलेल्या नेत्यांना अमरावतीत हलवण्यात आले आहे. संपूर्ण अचलपूर उपविभागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अचलपूर, परतवाडा शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

अकोटमध्येही संचारबंदीः दगडफेकीच्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ तासांसाठी ही संचारबंदी असेल. अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात शांतता असतानाच काल अकोट शहरातील हनुमाननगर आणि नवगाजी प्लॉट भागात दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकोलमध्ये नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून १४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात आरोग्यसेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.

माजी मंत्री अनिल बोंडे पोलिसांच्या ताब्यातः भाजपने काल पुकारलेल्या अमरावती बंददरम्यान घडलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्यांची धरपकड सुरू केली असून माजी कृषी मंत्री अनिल बोडे, भाजपच्या महिला अध्यक्षा निवेदिता चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा