उस्मानाबादच्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0
81
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: केंद्राच्या दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कार्यक्रमाअंतर्गत देशातील प्रभाग संघांना समाजोपयोगी कामांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याअंतर्गत ‘उमेद’तर्फे  (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) नामांकन देण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नवप्रभा महिला प्रभाग संघाचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (DAY-NRLM) या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरून ‘आत्मनिर्भर संघटन’ या पुरस्कारासाठी देशभरातून नामांकने मागविली होती. देशातील विविध राज्यांनी प्रभाग संघाची नामांकने दिलेली होती. ‘उमेद’ तर्फे जेवळी, ता. लोहारा या संघाचे नामांकन देण्यात आले होते. यामधून राष्ट्रीय स्तरावर तीन संघांची निवड करण्यात आली असून या तीनपैकी नवप्रभा महिला प्रभाग संघ, जेवळी, ता. लोहारा या प्रभाग संघाला आत्मनिर्भर संघटन या पुरस्काराची घोषणा झालेली आहे. ०८ मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुरस्कारासाठी निवड झालेल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाची स्थापना ऑक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी प्रभागातील ७ ग्राम पंचायती आणि ९ गावांमध्ये मागास आणि वंचित घटकांच्या एकूण २७५ स्वयंसहायता गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी ११ गट हे ज्येष्ठ व्यक्तींचे असून ७ गट दिव्यांग व्यक्तींचे आहेत. तसेच स्वयंसहायता गटांचे गावपातळीवर संघटन म्हणून १२ ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली आहे. स्वयंसहायता गटामध्ये प्रभागातील ४ हजार ८८४ कुटुंबांपैकी ४ हजार ३६१ कुटुंबांचे समावेशन करण्यात आले असून या कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत.

यामध्ये गटांना ‘उमेद’ अभियानामार्फत उपलब्ध करून देण्यात येणारा फिरता निधी आणि समुदाय गुंतवणूक निधी कर्ज स्वरुपात दिला जातो. तसेच उपजीविका निर्मिती आणि बळकटीकरणासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रभागामध्ये किशोरवयीन मुलींचे ३६ गट स्थापन करण्यात आले असून स्त्री-पुरुष समानता आणि वैयक्तिक आरोग्य या विषयांवर त्यांच्यासोबत जाणीवजागृतीचे काम करण्यात येत आहे.

प्रभागातील २ हजार ७२६ कुटुंबांच्या शेती व बिगर शेती आधारित उपजीविका निर्मिती उदा. सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया, डालळ मील इ. च्या बळकटीकरणासाठी तांत्रिक सल्ला व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन इ. विभागांसोबत समन्वयातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. महिला, किशोरवयीन मुली आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या अनुषंगाने प्रभागामध्ये वैयक्तिक आणि सामुहिक पोषण परसबाग विकसन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यामध्ये ५२४ कुटुंबांनी पोषण परसबाग लागवड केली आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

पंचायतराज संस्थामध्ये महिलांचा सहभाग  वाढविण्याच्या अनुषंगाने नवप्रभा प्रभागसंघ काम करत आहेत. प्रभागातील एकूण ७ महिला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या असून त्यापैकी २ महिला या सरपंच म्हणून काम करत आहेत. प्रभाग संघाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे उमेद अभियानातील महिलांचे मनोबल वाढले आहे. या पुढील काळात अभियानाला आणि राज्यातील इतर प्रभाग संघांना हा पुरस्कार दिशादर्शक ठरेल असे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले जागतिक महिला दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमातही या प्रभाग संघाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा