‘आयफोनच्या बदल्यात सीबीआय अधिकाऱ्याने लीक केला अनिल देशमुखांचा क्लीनचिट रिपोर्ट’

0
106
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सीबीआयचे काही अधिकारीही आयफोनच्या बदल्यात गोपनीय माहिती लीक करतात का? किमान सीबीआयचा आरोप तरी तसाच आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोप प्रकरणातील सीबीआयचा  ‘ क्लीनचिट’ प्राथमिक चौकशी अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना आयफोन १२ प्रो लाच म्हणून भेट देण्यात आला होता, असा दावा सीबीआयनेच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.  अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांनी गोपनीय माहिती लीक करण्यासाठी हा आयफोन भेट म्हणून दिला होता, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणातील सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. या प्राथमिक चौकशी अहवालात देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली होती. देशमुख यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळला नसल्यामुळे चौकशीची फाइल बंद करण्यात यावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. या अहवाल लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सीबीआयने हा अहवाल लीक कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती नेमली होती.

 सीबीआयने या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच आपलेच अधिकारी उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. त्यानंतर गुरूवारी अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली. सीबीआयने ३१ ऑगस्ट रोजी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, अनिल देशमुख प्रकरणाची तपास करण्यासाठी अभिषेक तिवारी यांनी पुण्याचा दौरा केला होता. त्याच दरम्यान आनंद डागा यांनी अभिषेक तिवारी यांची भेट घेतली आणि चौकशी अहवालासंदर्भात माहिती देण्याच्या बदल्यात एक आयफोन १२ प्रो लाच म्हणून भेट दिला. हे सार्वजनिक कर्तव्याचे अनुचित पालन आहे.

सीबीआयने अभिषेक तिवारी यांच्याकडून हा आयफोन १२ प्रो जप्त केला आहे. तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिवारींनी भेट म्हणून घेतलेल्या आयफोन १२ प्रोची किंमत एक लाखांपेक्षा जास्त आहे.

 अनिल देशमुख प्रकरणातील तपास अधिकारी आर. एस. गुंजाल यांना अभिषेक तिवारी हे तपासात सहकार्य करत होते, तेव्हाच तिवारी हे आनंद डागा यांच्या संपर्कात आले, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे. अभिषेक तिवारी यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तपासाशी संबंधित अनेक दस्तावेज आनंद डागा यांच्याशी शेअर केले, असेही सीबीआयने म्हटले आहे. अभिषेक तिवारींनी अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांच्याकडून रोख रकमेच्या स्वरुपातही लाच घेतल्याचा सीबीआयला संशय आहे.

विशेष म्हणजे हा लीक झालेला प्राथमिक चौकशी अहवाल खरा आहे की खोटा, याबाबत सीबीआयने अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या अहवालाच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा