परमबीर सिंगांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्तीः पोलिस आयुक्तांचा गृह विभागाला अहवाल

0
152
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा पोलिस दलात सामावून घेण्याचा निर्णय़ मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच घेतला आणि त्यांच्या आग्रहामुळेच  सह आयुक्तांना सचिन वाझे यांची नियुक्ती गुन्हे शाखेतील गुप्तवार्ता कक्ष ( सीआययू) या अत्यंत महत्वाच्या विभागात नाईलाजास्तव करावी लागली. गुन्हे शाखेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून वाझे थेट तत्कालीन पोलिस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंग यांचेच तसे आदेश होते, असा अहवाल मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला दिला आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या सह पोलिस आयुक्तांचा विरोध असतानाही वाझेंची नियुक्ती सीआययूमध्ये करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

उद्योपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलाया या निवासस्थानाशेजारी आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून झालेली उचलबांगडी यामुळे मुंबई पोलिस हादरून गेले आहे. एका एपीआयच्या कृत्याचा फटका संपूर्ण मुंबई पोलिस दलाला बसल्यामुळे गृह विभागाने मुंबई पोलिसांकडे या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल मागितला होता. आठ प्रश्न आणि त्यांचे उपप्रश्न यांच्या उत्तरांचा पाच पानांचा अहवाल नगराळे यांनी गृह विभागाला सादर केला आहे.

 गुन्हे शाखेमध्ये तपास अधिकारी हा सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि त्यानंतर सहपोलिस आयुक्तांना रिपोर्टिंग करतो. परंतु वाझे हा पदानुक्रम डावलून थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्टिंग करत होते. तसे सिंग यांचेच तोंडी आदेश होते, असे या अहवालात म्हटले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक असलेल्या वाझेंकडे सीआययूच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यास तत्कालीन सहाय आयुक्तांनी कडाडून विरोध केला होता. मात्र परमबीर सिंग यांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्ती करून घेतली. तत्पूर्वी परमबीर सिंग यांनी गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक, प्रभारी निरीक्षकांची बदली, नियुक्ती सहआयुक्तांच्या पूर्वसंमतीनेच केली जावी, असे लेखी आदेश सहआयुक्तांना दिले होते. त्यामुळे वाझेंच्या नियुक्तीबाबत सहआयुक्तांचा नाईलाज झाला. वाझेंची नियुक्ती करण्यापूर्वी सीआययूचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनय घोरपडे आणि पोलिस निरीक्षक सुधाकर देशमुख यांची अन्यत्र बदली करण्यात आली, असेही या अहवालात म्हटले आहे.

मंत्रिस्तरीय बैठकीत आयुक्तांसह वाझेः टीआरपी घोटाळा, दिलीप छाब्रिया प्रकरण आदी महत्वाच्या प्रकरणांमध्ये मंत्रिस्तरीय बैठकीला तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह वाझे कायम हजर असत. या बैठकांमध्ये निर्णायक किंवा तपासाला गती, दिशा देणाऱ्या मुद्यांवरील निर्णयांची माहिती वाझे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत, असेही या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा