सहा लाखांच्या आत कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

0
200
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता सहा लाख रूपयांच्या आत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

यापूर्वी जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये असणारी परदेशी विद्यापीठे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी उत्पन्नाची कोणतीही अट नव्हती. मात्र जागतिक क्रमवारीत १००१ ते ३०० दरम्यान असलेली परदेशी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रूपयांच्या आत असावे, अशी अट होती. यामुळे आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांनाच या बदलामुळे या योजनेचा लाभ मिळणार आहे.

परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधी त्याच अभ्यासक्रमातील पदवी असणे अनिवार्य होते. ही अट आता रद्द करण्यात आली आहे. एखाद्या विद्या शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने सरकारने ठरवून दिलेल्या अन्य शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानुसार प्रवेश दिल्यास या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहितीही मुंडे यांनी दिली.

परदेशातील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढवून २०० करावी आणि कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ८ लाख रूपये करावी, अशी विविध विद्यार्थी संघटना आणि अन्य घटकांची मागणी आहे. या मागणीबाबतही विचार सुरू असल्याचे सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा