शासकीय कार्यालयांत ऍन्टिजेन चाचणीनंतरच प्रवेश, पहिल्याच दिवशी आढळले तीन पॉझिटिव्ह

0
228
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेत वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यातच आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि विभागीय आयुक्तालय या सरकारी कार्यालयांत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अॅन्टिजेन चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तरच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात पथके तैनात केली असून आज बुधवारपासूनच ही तपासणी मोहीम राबवण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशीच्या तपासणीत तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

औरंगाबाद शहरात सर्वत्र कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मागील सहा दिवसापासून रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक आढळत असून मंगळवारी तर एका दिवसात तब्बल २४० बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी अभ्यांगतांची अॅन्टिजेन चाचणी करण्यासाठी महापालिकेने पथके तैनात केली आहे. या कार्यालयात येणार्‍या नागरिकांना अॅन्टिजेन चाचणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. आज बुधवारपासून या कार्यालयांत अॅन्टिजेन चाचणी करण्यास सूरूवात देखील झाली आहे. सुटीचे दिवस वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नित्याने महापालिकेचे पथक या कार्यालयांत प्रवेशद्वारावरच चाचणी करेल. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधितांना तातडीने पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्तालयात २, जिल्हाधिकारी कार्यालयात १ जण पॉझिटिव्हः विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि पोलीस आयुक्त कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची आजपासून अ‍ॅन्टिजेन टेस्ट सूरू केली आहे. पहिल्याच दिवशी चारही कार्यालयात २२८ नागरिकांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी विभागीय आयुक्तालयात १०० जणांची टेस्ट केली असता २ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ३९ जणांची टेस्ट केली असता १ जण पॉझिटिव्ह आढळून आला. पोलीस आयुक्तालयात २० जणांची तर मनपामध्ये ६९ जणांची अ‍ॅण्टिजेन टेस्ट करण्यात आली.

प्रवेशव्दारावरूनच अभ्यागतांनी धूम ठोकलीः विविध कामासाठी सरकारी कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय आणि पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या नागरिकांची अ‍ॅण्टिजेन टेस्ट सूरू केली. कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच अ‍ॅण्टिजेन टेस्ट केल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले आहे. विविध कार्यालयात टेस्ट होत असल्याचे पाहून अनेक अभ्यागतांनी कार्यालयात जाण्याचे धाडस न करता प्रवेशव्दारावरूनच धूम ठोकली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा