रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई

0
140
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी त्यांच्या वरळीतील राहत्या घरातून अटक केली आहे. अटकेनंतर पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

 ५ मे २०१८ रोजी इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नवा होते. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप करत आपल्या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी जबाबदार असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरिअर डिझाइनचे काम केले होते. या कामापोटी नाईकांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही अर्णब यांनी नाईकांना त्यांचे पैसे दिले नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हाही नोंदवला होता. परंतु तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यामुळे अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नव्हती.

हेही वाचाः ठाकरे सरकारच्या बदनामीसाठी ट्विटरवर हॅशटॅग स्कॅमः मुंबई पोलिसांनी केला षडयंत्राचा भंडाफोड

 यावर्षीच्या मे महिन्यात अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार केली होती. अलिबाग पोलिसांनी चौकशीच केली नसल्याचे आज्ञाने तक्रारीत म्हटले होते. आज्ञाच्या तक्रारीवरून गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी अर्णब यांना अनेकदा समन्स बजावूनही पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. परंतु मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका अर्णब यांनी घेतली होती. त्यामुळे अखेर आज पोलिसांनी त्यांना अटक केली.

महाराष्ट्राचे पोलिस कधीच कुणावर अन्याय करत नाहीतः अर्णब यांच्या अटकेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायद्याने काम चालते. आमच्याकडून काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलिस कधीही कुणावर अन्याय करत नाहीत किंवा सुडाने कारवाईही करत नाहीत. कुणी गुन्हा केला आणि तो दडपला असेल तर आणि त्याच्या तपासाचे काही धागेदोरे हाती आले असेल तर पोलिसांनी कारवाई केली असेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. या कारवाईशी राजकीय पक्षाचा संबंध असण्याचे काहीच कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरणः अन्वय नाईक हे कॉन्कॉर्ड डिझाइन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक होते. ही कंपनी आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करते. अर्णब गोस्वामी यांनी कॉन्कॉर्ड कंपनीकडून रिपब्लिकन टीव्हीच्या आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करून घेतले. परंतु अर्णब यांनी ८३ लाख रुपये दिलेच नाहीत. त्यामुळे वडिल आणि आजीला आत्महत्या करावी लागली, असा आज्ञा नाईक यांचा आरोप आहे. अलिबाग पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपासच केला नसल्याचाही आज्ञा नाईक यांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा