कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर भाजपने केलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय

0
393
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी भाजपच्या फडणवीस सरकारने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर केलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

 फडणवीस सरकारच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची तज्ज्ञ संचालक म्हणून वर्णी लावण्यात आली होती. या नेमणुकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर खंडपीठाने या नियुक्त्या रद्द करण्याचा निवाडा दिला होता. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे भाजप सरकारने 13 जून 2015 रोजी बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेऊन भाजप कार्यकर्त्यांची वर्णी लावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नियुक्त्या रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली आणि अशा प्रकारच्या नियुक्त्यांची तरतूद रद्द करण्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा