फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मराठी साहित्य संमेलानध्यक्षपदी निवडीला धर्माच्या नावावर विरोध

0
207

मुंबईः उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाल्यानंतर आता त्यांच्या ख्रिस्ती धर्माचे नाव पुढे करून विरोध केला जात आहे. दिब्रिटो यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून त्यांच्या धर्मांच्या नावावर द्वेषाचा विखार पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. ब्राह्मण महासंघाने तर या निवडीला जाहीर विरोध केला आहे.

प्रतिगामी शक्ती आणि झुंडशाहीविरोधात ठाम भूमिका घ्यायलाच हवी असा आग्रह धरणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे कायम प्रबोधनात्मक परिवर्तनाचा वारसा जपला आहे. देशात गोरक्षणाच्या नावाखाली झुंडबळीचे प्रकार वाढत असताना गाय महत्वाची की माणूस हे ठरवावेच लागेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. दिब्रिटो यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता उस्मानाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेसह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न सहा घटक संस्थांनी संमेलनाध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांच्याच नावाचा आग्रह धरल्याने ही निवड झाली. या निवडीचे मराठी साहित्य जगतातून जोरदार स्वागतही झाले. परंतु आता दिब्रिटो हे कॅथॉलिक पंथीय ख्रिश्चन धर्मगुरू असल्याची बाब पुढे करून सोशल मीडियावर धार्मिक द्वेषाचा विखार पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. हे करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषाही वापरली जात आहे. आता मराठी साहित्य महामंडळ आणि मराठी साहित्य जगत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचाः ‘गाय महत्वाची की माणूस?’ असा सवाल करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो मराठी साहित्य महामंडळाला पेलतील का?

ब्राह्मण महासंघाचा विरोधः

ब्राह्मण महासंघाचे अनिल दवे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड हा मराठी वैचारिक विश्वातील काळा दिवस असल्याचे सांगत या निवडीला विरोध केला आहे. हिंदुत्वाला शिव्या देण्यात दिब्रिटो कायम अग्रस्थानी असतात. ख्रिस्ती धर्मांतर करणे हेच फादरचे जीवन ध्येय्य असल्याचा आरोप दवे यांनी केला आहे.

अशाच काही पोस्टपैकी डॉ. अभिराम दीक्षित यांच्या नावाने फिरत असलेल्या पोस्टचा संपादित भाग असाः

‘साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मातराची बुवाबाजी ?

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्रयांची नेमणूक होत आहे . हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे. या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय ? त्याला काय म्हणून अध्यक्ष केले ? फादरने कोणती पुस्तके लिहिली आहेत ? फादरच्या पुस्तकांची नावे काय आहेत ? – फादरची पुस्तके पुढीलप्रमाणे : – ख्रिस्ताची गोष्ट,  ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल,  आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, सुबोध बायबल – नवा करार, परिवर्तनासाठी धर्म ,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची , मुलांसाठी बायबल!  फादर फ्रान्सिस दिब्रेटोची  ही मराठी  साहित्यसेवा आहे ? की ख्रिस्त सेवा आहे?’

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा