जो भी है, बस यही एक पल है !

0
159

कोरोना हे षडयंत्र आहे असे जरी वादासाठी मान्य केले तरी विनंती हीच आहे की, या षडयंत्राला आपण बळी पडायला नको. जर काही वैचारिक चळवळी संपवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असेल तर आपण स्वत:हून मान सापळ्यात का अडकवायची? ‘ठराविक विचारांची लोक हॉस्पिटलला गेली की त्या माणसांचा काटा काढला जातो’ असाही एक विचार आहे.मग माझे म्हणणे असे आहे की ‘हॉस्पिटलपर्यंत जाण्याच्या वेळेला आपणच निमंत्रण का देतो?

-संदीप बंधुराज

‘हॅलो, नमस्कार….’,
‘हॅलो कोण ?’
‘XXX साहेबांचा नंबर ना ?’
‘हो’
‘ बेटा, मी त्यांचा मित्र बोलतोय, पप्पांकडे फोन दे…’
‘….’
‘ हॅलो, बेटा माझा आवाज येतोय का ? पप्पांकडे फोन दे जरा’
‘ ….हॅलो…’
‘ नमस्कार, XXX साहेब, कसे आहात, खुप दिवसांनी आठवण झाली म्हणून कॉल केला सहजच..’
‘ कोण पाहिजेय तुम्हाला ?’
‘कोण बोलतंय ?’
‘ मी XXX यांचा मुलगा ‘
‘ बेटा पप्पांकडे फोन दे, बिझी आहेत का ते ? की झोपलेत?’
‘ थांबा एक मिनिट…घे गं तूच बोल …’
‘ हॅलो…मी त्यांची मुलगी….’
‘ बेटा, पप्पा नाही आहेत का घरी, बोलू शकत नाहीत का ?’
‘ हो नाही बोलू शकत…’
‘ का … ?’
‘ ते नाहीयत….ते वारले,…..’
‘ काय ? कसे ? ‘
‘ कोरोनाने….’
‘…………………….’

हा संवाद काल्पनिक नाहीय. माझ्यासोबत घडलेला प्रत्यक्ष प्रसंग आहे…कोरोनाने नवीन स्वरुपात डोके वर काढले आहे…सर्व क्षणिक बनले आहे…कोण कधी कसा कोरोनाच्या तावडीत सापडेल व आयुष्य गमावून बसेल काही सांगता येत नाहीय..एवढी अनिश्चीतता कधीच नव्हती…माझ्या संपर्कातील अनेकजण कोरोनाने खाऊन टाकलेत…वरच्या प्रसंगाने मला प्रचंड धक्का बसला….खूप दिवसांपासून ज्यांची खबर मिळाली नाही, ज्यांच्याशी  संपर्क झाला नाही त्यांची आठवण झाली की फोन करताना समोरुन काही भलतो सलते ऐकू येईल की काय अशी शंका वाटत राहते…!

कोरोना नावाचा काही आजार आहे हेच मान्य न करणारा एक वर्ग माझ्या बघण्यात आहे. लसीवर विश्वास ठेवण्यास तयार नसलेली माणसेही आहेत…तऱ्हेतऱ्हेचे युक्तीवाद आहेत… त्यात एक आहे की, ‘कोरोना हे षडयंत्र आहे. आंतराराष्ट्रीय व्यापाऱ्यांचे आणि सराकारांचे’ आणि ‘दुसरा आहे की लस कोरोनाची नाहीच. काही तरी थातूरमातूर लस देवून क्रेडिट घेण्याचा प्रकार आहे…’.बरे अशा युक्तीवाद करणाऱ्यांमध्ये मला एकही डॉक्टर सापडला नाही. नाही म्हणायला एक डॉक्टर असा आपटला की त्याने कोरोनाच्या लसीला विरोध चालवला; का तर म्हणे महाराष्ट्रात सरकार नीट काळजी न घेता लस देत आहे….म्हणजे मोदींभक्त म्हणून लसीचे समर्थन करणारे महाराष्ट्रात केवळ उद्धव विरोध म्हणून लसीच्या साठवणुकीचा मुद्दा पुढे करुन लसीकरणाविरोधातील मॅसेज फॉरवर्ड करत आहेत…(नेहमीप्रमाणे आजही ठराविक मॅसेज ठराविक लोकांकडूनच येत असतात !)…युक्तीवाद काहीही असोत कोरोनामुळे जे बाधित झालेत किंवा ज्यांनी आपले स्वकीय गमावलेत त्यांची खबर घेतली की कळेल कोरोनाचे गांभीर्य ….! मी माझे काही मित्र गमवलेत…माझ्या मित्रांनी आपले नातेवाईक गमवलेत…आई..बायको..भाऊ…!

कोरोना हे षडयंत्र आहे असे जरी वादासाठी मान्य केले तरी विनंती हीच आहे की, या षडयंत्राला आपण बळी पडायला नको. जर काही वैचारिक चळवळी संपवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असेल तर आपण स्वत:हून मान सापळ्यात का अडकवायची? ‘ठराविक विचारांची लोक हॉस्पिटलला गेली की त्या माणसांचा काटा काढला जातो’ असाही एक विचार आहे. मग माझे म्हणणे असे आहे की ‘हॉस्पिटलपर्यंत जाण्याच्या वेळेला आपणच निमंत्रण का देतो? का काळजी घेत नाही? केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून स्वत: असुरक्षित वावरायचे म्हणजे ‘मी मरेन पण तुला विधवा करेन…’ ही हेकेखोर प्रवृत्तीच नव्हे का?

‘ती लसही बोगस आहे’ असे मानू वादासाठी. पण ती घेतल्यास काय बिघडणार आहे? मी स्वत: कोव्हीशिल्ड घेतलेली आहे. मला तर काहीच त्रास झालेला नाही.       (ताप येणे, थोडसा थकवा येणे हे सर्वसाधारण आहे. कोणत्याही लसीमुळे हे होतेच. मला तर तेही झालेले नाही) लस घेतली म्हणून अमरपट्टा मिळाल्याप्रमाणे  मी काही नाक पुढे काढून मोकाट नाही फिरलो….काळजी घ्यावीच लागेल लस घ्या किंवा घेवू नका…हेल्मेट असूनही माणूस मेला म्हणून हेल्मेट काहीच कामाचे नाही असे म्हणणे चुकीचे आहे…अनेकजण केवळ हेल्मेटमुळेच वाचलेले आहेत…(…मीही !)…लस घेवूनही काही जण कोरोनाबाधित होत आहेत हे खरे आहे, पण या लोकांनी लस घेतल्यानंतर काही निष्काळजीपणा केल्याचीच शक्यता असणार आहे…

आजही लोक सर्रास निष्काळजीपणे वावरताना दिसत आहेत. धार्मिक कार्यक्रम, सामजिक कार्यक्रम, सण, उत्सव साजरे करतानाच नव्हे तर बाजार, कार्यलयांत वावरतानाही लोक काळजी घेताना दिसत नाहीत. (राजकीय लोकांकडून काही शहाणपणाची अपेक्षा मला तरी नाहीच) प्रत्येकजण ‘ मला काही होत नाही, माझ्यामुळे कुणाला काही होत नाही’ अशा अविर्भावातच वावरताना दिसतो. मोठमोठ्या शहरात दोन मीटरचे अंतर ठेवून राहणे कठीण असले तरी मास्क लावण्यात कोणती अडचण आहे कळत नाही.

ज्या देशाचा प्रधानमंत्रीच विनामास्क लस घेण्यासाठी जात असेल, मास्कऐवजी दुपट्टा गुंडाळून जाहिरात करत असेल. मोठमोठ्या रॅली करत असेल तेथे सर्वसामान्य नागरिकांकडून कशी अपेक्षा ठेवायची म्हणा…पण लक्षात घ्या त्यांना कोरोना झाला तर त्यांच्यासाठी यंत्रणा सज्ज आहे…बाकीच्यांसाठी रुग्णालयात खाटही मिळणे मुष्कील बनते..पुण्यात एक पत्रकार असाच गेला…!

कोरोना नाहीच आहे असे म्हणणारी माणसे, कुठे ‘कोरोना कोरोना’ करत बसायचे अशी स्थिती असलेली माणसे आणि ‘कळतेय पण वळत नाही’ अशी पढतमुर्ख माणसे आणि काय व्हायचे ते होऊ दे अशा विचारांची बेफिकीर, माथेफिरु माणसे यामुळे कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले आहेत……यात तरुण अधिक आहेत… प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी आपण त्याखाली चिरडून नाही गेलो पाहिजे…

अनेकजण लोकांमध्ये बिनधास्त मिसळतात…एक दोन दिवसांनी त्रास झाला की मग तपासणी करुन घेतात आणि मग कोरोना पॉझिटिव्ह ठरले की मग ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलो त्यांना क्वॉरंटाईन व्हायला सांगतात…(काही लोक तर तेवढेही औदार्य दाखवत नाहीत) बडे बडे लोक यात आहेत…कलाकार आहेत. अधिकारी आहेत. लोकप्रतिनिधी आहेत. मंत्री आहेत हे असे का ? का नाही ही मंडळी शहाण्यासारखी वागत..मुळातच दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटरचे अंतर ठेवायला सांगितले असताना ही लोक अशी जवळीक का करतात? आता अशी वेळ आली आहे की घरातही दोन मीटर अंतर ठेवून व सर्व सावधता बाळगून रहायला हवे…!

एवढी अनिश्चीतता निर्माण झालेली आहे की, क्षणात होत्याचे नव्हते होत आहे…’ आपल्याकडे आताच एकच क्षण आहे. पुढचे चांगले क्षण पाहायचे असतील तर हा क्षण सुरक्षितपणे काढला पाहिजे..’ आयुष्य हे क्षणभंगुर आहे हे खरे पण प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे…कोरोना हा आनंद हिरावून नेवू शकतो…अनेकांचा हिरावला गेला आहे…

एखाद्या घरात कोरोनाचा पेशंट आढळला सर्व नातेवाईंकाचे, मित्र परिवारांचे धाबे दणाणून जातात.  अगदी जवळच्यांना तर प्रचंड मानसिक ताण येतो, काय आपल्याला आपल्या कुटुंबीयांना असा ताण द्यावासारखा वाटतो? प्रत्येकाने याचा विचार करायला हवा… कोरोनाने दगावणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे…या कमीत आपले नाव असू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे…सर्वांना विनंती आहे, की कोरोनाला हलक्यात घेवू नका, लस टोचून घ्या! मला तुम्ही सर्व तुमच्या कुटुंबीयांसह हवे आहात…! काळजी घ्या….!!!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा