जॉर्ज फ्लॉईड हत्याविरोधी आंदोलनः गोऱ्यांच्या ऐतिहासिक दमन प्रवृत्तीविरुद्धचा उद्रेक!

0
62
छायाचित्र सौजन्यः द कॉन्व्हर्जेशन

श्वेतवर्णीयांची पूर्वापार चालत आलेली वर्णद्वेषी मानसिकता अजूनही गोऱ्यांमध्ये टिकून आहे. अमेरिकेत या वंशभेदातून मागच्या शतकाच्या आरंभी यादवी झाली होती. हा विद्वेष अनेकदा उफाळून येतो. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून श्वेतवर्णीयांबाबतची त्यांची विधाने आणि धोरणे यांनी अमेरिकन कृष्णवर्णीयांत असंतोष निर्माण झाला. श्वेतवर्णीयांमध्ये काळ्या लोकांचा द्वेष करणाऱ्या मोहिमा सुरू झाल्या. त्यातूनच कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाली आणि संपूर्ण अमेरिका- युरोपियन देशांत इतिहासातील जुलमी, वंशद्वेष करणाऱ्यांच्या स्मृती पुसून टाकण्याची आंदोलने सुरू झाली. ही आंदोलने गोऱ्यांच्या ऐतिहासिक दमन प्रवृत्तीविरुद्धचा उद्रेक आहेत…

आर. एस. खनके, पुणे

अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात श्वेतवर्णीय डेरेक मायकेल नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय तरुण जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर पाय देवून जीव घेतला. श्वासाने गुदमरून जीव जाईपर्यंत या वंशवादी विखारी पोलिस अधिकाऱ्याने जॉर्जच्या गळ्यावरचा पाय उतरवला नाही. या अमानुष हत्येचा जगभर निषेध झाला. अमेरिका आणि युरोपात त्याविरोधी प्रखर आंदोलने झालीत आणि होत आहेत. Black Lives Matters म्हणजे काळ्या लोकांच्याही जीवनाला मूल्य आहे, असे म्हणत माणसाच्या मूलभूत अधिकारांसाठी जगभरातून आंदोलने होत आहेत.

या वंशविरोधी कृत्याने अमेरिका आणि इंग्लंडसह युरोपात वंशद्वेषाच्या स्मृती जपणाऱ्या पाऊलखुणा जमीनदोस्त केल्या जात आहेत. पोलिस विभागाच्या अशा पोलिसी वृत्तीविरोधी राग प्रकट करण्यासाठी अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात फ्रँक रिझो या माजी महापौर पोलिस कमिश्नरचा पुतळा उखडून टाकण्यात आला. या शहराचा तो महापौर आणि पोलिस कमिश्नर होता. हा श्वेतवर्णीय रिझो कृष्णवर्णीय लोकांबाबत द्वेष आणि भेदभाव करण्यात कायम अग्रेसर असायचा. आपल्या आयुष्यात चारवेळा निवडणुकीला सामोरे गेलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या मिझोने वांशिक भेदभावाचा प्रचार करताना Vote white चे अभियान राबवले होते. कृष्णवर्णीय लोकांना शहराबाहेर काढण्याची कुप्रसिद्ध मोहीम मिझो यांनीच राबविलेली होती. तत्पूर्वी पोलिस कमिश्नर असताना १९६०-७० च्या कालावधीत त्याच्या पोलिसी अत्याचाराला तेथील कृष्णवर्णीय लोक बळी पडले होते. त्या जुलमी आणि वंशविरोधी स्मृती नको म्हणून २ जून रोजी त्याचा फिलाडेल्फिया शहरातला पुतळा जमीनदोस्त करण्यात आला. या शहराचे विद्यमान महापौर जिम केन्नी या कृतीचे समर्थन करताना जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचे आहे. ते म्हणतात, ‘This is the beginning of healing process in our city. This is not the end of the process. Taking the statue down is not the be-all and end-all of where we need to go.’

याच आंदोलनाची धग इंग्लंडपर्यंत पोहोचली. त्यातून ब्रिस्टॉल शहरात इतिहास घडला. माणसासारख्या माणसांना गुलाम म्हणून जनावरांसारखा त्यांचा व्यापार करणारा कुप्रसिद्ध व्यापारी एडवर्ड कोलस्टनचा पुतळा उखडून ब्रिस्टॉलच्या समुद्रात बुडवण्यात आला. कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांना गुलाम बनवून अमानुष वागणूक देणारं आणि गुलामांच्या व्यापारातून उभं राहिलेलं, भरभराटीला आलेलं ऐतिहासिक असं हे ब्रिस्टॉल शहर. या शहराच्या मध्यवस्तीत सुमारे १२५ वर्षापासून उभा असलेला वंश श्रेष्ठत्वाच्या चाहत्यांनी जपलेला पुतळा ८ जून २०२० रोजी विविध वंशवाद विरोधी आंदोलकांनी उखडून समुद्रात बुडवला. या दिवशी ज्या व्यापारातून मिळालेल्या पैशातून या शहराचे रस्ते बांधले गेले होते त्याच मार्गावरून या अमानुष आणि कुख्यात व्यापाऱ्याचा पुतळा फरफटत नेला गेला.

ज्या माणसाच्या व्यापार नीतीने आणि वंशभेदी विचाराने लाखो लोकांचा श्वास शेकडो वर्षापासून गुदमरून टाकला. त्या गुलामांचा व्यापारी, नर संहारक, साम्राज्यवादी एडवर्ड कोल्सट्नचा उभा पुतळा आंदोलकांनी बुडापासून पाडून टाकला. आणि ज्या तऱ्हेने जॉर्ज फ्लॉईडची गळा दाबून हत्या केली त्याप्रमाणे जमिनीवर पाडलेल्या पुतळ्याच्या मानेवर पाय ठेवून प्रतिकात्मक हत्या केली.  आफ़्रिकी लोकांना जहाजातून वाहून नेताना प्रवासात मृत्यू आलेल्याना समुद्रात शार्क माशापुढे फेकून दिले जात होते त्याचे प्रतीक म्हणून ब्रिस्टॉल बंदराच्या ठिकाणी तो पुतळा समुद्रात बुडवण्यात आला.

वरील दोन्ही वर्णद्वेषी पुतळे हटवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनचे अंदोलनकारी छोटी-मोठी आंदोलने करत होती. मात्र जॉर्जच्या हत्येने या आंदोलनात पेटलेल्या आगीने या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोन्ही देशात वर्णद्वेषी शेतवर्णींच्या जुलमी इतिहासाच्या स्मृती पुसून टाकल्या. एडवर्ड कोलस्टनचा पुतळा पाडून आंदोलकांनी इतिहास नष्ट केला नाही. तर अमानुष प्रथेचा पुतळा पाडून आंदोलनकर्त्या लोकांनी इतिहास घडवला.

 हा एडवर्ड कोलस्टन कोण होता? त्याचा इतिहास काय? आंदोलकांनी तो का पाडला?  हे समजून घेतल्याशिवाय या आंदोलनाला आपण न्याय्य ठरवू शकत नाही. म्हणून ब्रिस्टॉल आणि तिथला हा कुख्यात व्यापारी यांच्या बाबत जाणून घेणे आवश्यक आहे. ११ व्या शतकापासून या ब्रिस्टॉल शहराला गुलामांचा व्यापार करण्याची परंपरा आहे. त्यावेळी आयरिश आणि इंग्लिश गुलामांचा व्यापार या शहरातून चालत होता.

साम्राज्यवादी ब्रिटिशांनी व्यापाराला राजाश्रय देवून चालना दिली. औद्योगिकीकरणाला सुरुवात झाल्याने तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी आणि कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कामगार आणि बाजारपेठ आवश्यक होती. त्यातूनच कॅरेबियन समुद्राच्या किनारी अमेरिकेत इंग्रजी वसाहती वाढू लागल्या. याच दरम्यान व्यापाराचा सुप्रसिद्ध ट्रॅंगल तयार झाला. इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल विकून तिथून गुलाम खरेदी करणे, अमेरिकेत नेवून विकणे, त्या पैशातून कच्चा माल घेवून तो व्यापारयोग्य करण्यासाठी इंग्लंडला आणणे. या त्रिकोणाच्या पुनरावृत्तीतून व्यापार वाढीस लागला आणि आफ्रिकी लोकांना गुलाम बनवण्याचा उद्योग भरभराटीस आला. ब्रिस्टॉल शहर या गुलाम व्यापाराच्या उलाढालीचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. पक्का माल अफ्रिकी देशात विकायला जात असताना स्थानिक प्रतिस्पर्धी विजेत्या गटाकडून पराभूत आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून पश्चिम किनाऱ्यावर आणून आफ्रिकी लोक ब्रिटीशांना विकत असत.

१६३६ मध्ये याच ब्रिस्टॉल शहरात जन्मलेल्या एडवर्ड कोल्स्टन या ब्रिटिश व्यापाऱ्याचे नाव आफ्रिकी गुलामांच्या व्यापारात आघाडीवर होते. गुलामांचा व्यापार करताना १६८० ते १६९२ या कालावधीत आपल्या व्यापार कौशल्याने  एडवर्ड कोल्स्टन रॉयल आफ्रिकन कंपनीचा ( आरएसी) डेप्युटी गवर्नर झाला.

गुलामांच्या व्यापारात ही आरएसी सर्वात आघाडीवर होती. १६७२ ते १७२०  दरम्यान या कंपनीने आफ़्रिकेतून सुमारे १५०,००० एवढे लोक गुलाम म्हणून आफ्रिकेतून जहाजाद्वारे आणली. आफ्रिका ते अमेरिका या प्रवासाच्या मार्गाला ब्रिटिश व्यापारातल्या त्रिकोणातील मिडल पॅसेज म्हणून ओळखले जाते. पहिला पॅसेज इंग्लंड ते आफ्रिकाजहाज प्रवासाचा आणि तीसरा पॅसेज म्हणजे अमेरिका ते इंग्लंड अशा जहाज प्रवासाचा.

गुलामांच्या व्यापारात या मिडल पॅसेजचा इतिहास भयावह आहे. या पॅसेजमध्ये श्वेतवर्णीयांच्या खऱ्या व्यथा दडलेल्या आहेत. आफ्रिकेच्या विविध देशांतून  पश्चिम किनाऱ्यावर काळ्या लोकांना आणले जायचे. अमेरिकी खंडातील कॅरेबियन समुद्राच्या किनाऱ्यालगत युरोपियनांची बागायती शेती आणि व्यापारी वसाहती वाढल्या होत्या. तिथं उसाची, तंबाखूची आणि व्यापराला पूरक शेती करण्यासाठी या गुलामांची गरज होती.

आफ्रिकी किनाऱ्यावरून जहाजाच्या खालच्या भागात या लोकांना डांबले जायचे. त्यांनी पळून जावू नये किंवा प्रतिकार करू नये म्हणून त्यांच्या पायात लोखंडी बेड्या टाकल्या जात असत. दोन व्यक्तींच्या पायात एक बेडी अडकवलेली असायची. आफ्रिका ते अमेरिका असा प्रवास करायला साधारण सहा ते आठ आठवडे लागायचे. वातावरण खराब असेल तर हा प्रवास १२-१३ आठवडे लांबायचा. या दरम्यान जहाजातील चेंगराचेंगरी, कोंडमाऱ्याने, अस्वछतेने आणि इतर साथीच्या आजाराने अनेक लोकांचा मृत्यू होत असे.

प्रवासात मेलेल्या व्यक्तीला जेव्हा समुद्रात फेकून दिले जाई तेव्हा समुद्री पाण्यातील शार्क मासे त्या देहावर तुटून पडत असायचे. शेकडो वर्षे या मार्गावरुन चालणाऱ्या जहाजांना आपला मार्ग अचूक असल्याची खात्री या मार्गावरील माणसांच्या रक्तमांसावरून व्हायची असे म्हटले जाते. या रक्तरंजित समुद्री मार्गावरुन वर्षानुवर्षे हा गुलामांचा अमानुष व्यापार चालू होता. त्यात गुलामांचा सर्वाधिक यशस्वी व्यापार करणारा एडवर्ड कोल्सटन पहिला ब्रिटिश व्यापारी ठरला होता. 

या गुलामांच्या व्यापारात एकट्या एडवर्डच्या नेतृत्त्वाखाली रॉयल आफ्रिकन कंपनीने ८४,५०० आफ्रिकी काळ्या लोकांना मिडल पॅसेजच्या समुद्री मार्गावरून गुलाम म्हणून अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचवले. यामध्ये पुरुषांबरोबर, महिला आणि सहा वर्षापर्यंतच्या मुलांचाही समावेश असे. ही कंपनी आपल्या गुलामांच्या छातीवर Royal African Company चा अद्याक्षरात ‘RAC’ असा ब्रॅंडेड शिक्का मारायची. आफ्रिकेतून या गुलामांची वाहतूक करताना अमेरिकी किनाऱ्याला जहाज लागेपर्यंत या प्रवासा दरम्यान सुमारे १९,३०० म्हणजे एक चतुर्थांश लोकांचा जीव गेला होता. त्याचा मृत्युदर चारपैकी एक बालक असा होता.

गुलामांनी भरलेले जहाज यशस्वीरित्या आपल्या इच्छितस्थळी पोहोचवल्यावर बक्षीस म्हणून जहाजाच्या कॅपटनला एक किंवा दोन गुलामांना आपल्यासोबत इंग्लंडला आणता येत होते. सोबत आणलेल्या व्यक्तीला प्रिव्हिलेज निग्रोज म्हटले जायचे. त्यात अनेकजन तरुण मुले असायची. ती विशेष काळा गुलाम प्रिव्हिलेज निग्रोज म्हणून ब्रिस्टॉल शहरातील श्रीमंतांकडे विकली जायची. त्यांना वस्तू मानले जायचे. खास जाहिरातीतून अशा गुलामांची या शहरात विक्री होत असे.

श्वेतवर्णीयांची पूर्वापार चालत आलेली वर्णद्वेषी मानसिकता अजूनही गोऱ्यांमध्ये टिकून आहे. अमेरिकेत या वंशभेदातून मागच्या शतकाच्या आरंभी यादवी झाली होती. हा विद्वेष अनेकदा उफाळून येतो. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून श्वेतवर्णीयांबाबतची त्यांची विधाने आणि धोरणे यांनी अमेरिकन कृष्णवर्णीयांत असंतोष निर्माण झाला. श्वेतवर्णीयांमध्ये काळ्या लोकांचा द्वेष करणाऱ्या मोहिमा सुरू झाल्या. त्यातूनच डेरेक आणि त्याच्या साथीदार गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाली आणि संपूर्ण अमेरिका आणि युरोपियन देशांत असंतोष निर्माण झाला. इतिहासातील जुलमी आणि वंशद्वेष करणाऱ्यांच्या स्मृती पुसून टाकण्याची आंदोलने सुरू झाली.

अमेरिकी संविधानाप्रमाणे आम्हाला बरोबरीने आणि समतेच्या तत्वाने वागवले पाहिजे. आमच्याही जगण्याला मूल्य आहे. आम्हाला गुलामीच्या सर्व स्मृती नको आहेत, असा हा मानवतावादी आवाज आज उग्र झाला आहे. तो काळाच्या पटलावर अधिक मानवतावादाकडे घेवून जाणारा आणि माणसाला माणूस म्हणून जागवणारा असा न्यायसंगत संघर्ष आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा