कोरोना संकटामुळे जगभरात अन्नटंचाईचा धोका!

0
141
संग्रहित छायाचित्र.

कोरोना संकटाला सामोरे जाताना प्रत्येक देशाने आपल्या देशातील उपासमार आणि कुपोषण यापासून असुरक्षित असणाऱ्या लोकांचे संरक्षण केले नाही आणि अन्नसाखळी व्यवस्थित सांभाळली नाही तर जगभरात अन्नटंचाई निर्माण होण्याचा धोका आहे.

डॉ. श्रीकांत कळमकर, संचालक, ऍग्रो इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटर, आनंद (गुजरात)

कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. १९२९ च्या जागतिक महामंदीनेही केले नव्हते एवढे अपरिमित नुकसान कोरोना अर्थात कोरोनाया रोगाने शेतीचे केले आहे. भारतामध्ये अगोदरच अस्तित्वात असलेल्या असमानतेमध्ये वाढ होणार आहे. मागणी आणि पुरवठा दोन्ही एकाच वेळी घटण्याची अनन्यसाधारण परिस्थिती या काळात निर्माण झाली आहे. कोरोना संकटामुळे वस्तू सेवांचे उत्पादन आणि पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. याबरोबरच त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शेतीक्षेत्राला कामगार टंचाईचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या आणि सीमांत शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूरावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे, होत आहे.

कोरोना या महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवनवीन आव्हाने उभी राहणार आहेत. भारताचा विकास दर घसरणार आहे. मार्च ते जून या कालावधीमध्ये विकास दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा आत्मविश्वास न्यूनतम पातळीकडे घसरण्याचा धोका आहे. आपली मागणी पुढे ढकलण्याकडे या घटकांचा कल आहे. कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीमूल्य साखळी विस्कळित होणार असून, कृषी क्षेत्राला यातून सावरून बाजारपेठाच्या माध्यमातून आर्थिक बदल आणि विकास त्याला प्रोत्साहित करावे लागणार आहे.

…………………………….
टाळेबंदीच्या काळात कृषी मालाच्या किमतीत सुमारे २० ते ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली कोरोनाच्या प्रभावामुळे या वर्षी सुमारे १४० दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीचा सामना करावा लागू शकतो. परिणामी अन्न आणि पोषण असुरक्षेत वाढ होण्याचा धोका आहे.
…………………………….

सीमांत शेतकरी व शेतमजूर यांचे बरोबरच गहू, द्राक्ष, केळी, टोमॅटो, चना, कापूस, कांदा, बटाटा, मिरची, हळद यासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेणारे मध्यम व श्रीमंत शेतकरी सुद्धा कोरोना संकटामुळे अडचणीत आले आहेत. विक्रीव्यवस्था संपूर्ण देशभर लागून राहिलेल्या टाळेबंदीमुळे अडचणीत आली आहे. शेतात तयार झालेल्या, कापणी/काढणीला आलेल्या शेतमालाला या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागलेला आहे. या टाळेबंदी काळात कृषी मालाच्या किमतीत सुमारे २० ते ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली कोरोनाच्या प्रभावामुळे या वर्षी सुमारे १४० दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीचा सामना करावा लागू शकतो. परिणामी अन्न आणि पोषण असुरक्षेत वाढ होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांना शेतीतील पिकापासून मिळणारा परतावा घसरला तर शेतकरी या पिकापासून दूर जाण्याचा धोका निर्माण होईल. परिणामी या शेतमालाच्या किमतीमध्ये असंतुलन निर्माण होईल व अन्नधान्य चलनवाढ प्रभावित होईल. टाळेबंदीच्या काळात कोणतेही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने फुल उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आला आहे. कोरोना संकटामुळे दूध, मासे, मांस, अंडी, कोंबडी, आईस्क्रीम, थंडपेय, फुले-फळे, पामतेल त्या प्रमाणात प्रभावित झालेली आपणास आढळून येईल. परिणामी भारतीय अर्थव्यवस्था मोठ्याप्रमाणात संकुचित होईल. आकुंचन पावेल.  आता पीक पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. कामगार बचत पीक तंत्रज्ञानाचा उपयोगही नाकारता येणार नाही.

कोरोनाच्या संकटातून भारतीय शेतीला बाहेर काढण्यासाठी गावाभोवतीच पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना वाढवण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना ६ हजार रुपयांवरून १२ हजार रुपयापर्यंत वाढवण्याचीही गरज आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचा विस्तार आवश्यक आहे.  कोविड१९ ला सामोरे जाताना प्रत्येक देशाने आपल्या देशातील उपासमार आणि कुपोषण यापासून असुरक्षित असणाऱ्या लोकांचे संरक्षण केले नाही आणि अन्नसाखळी व्यवस्थित सांभाळली नाही तर जगभरात अन्नटंचाई निर्माण होण्याचा धोका आहे.

(मराठी अर्थशास्त्र परिषद आणि बल्लारपूर येथील कला, वाणिज्य महिला महाविद्यालय, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोनानंतरची भारतीय अर्थव्यवस्था या वेब संवादात कोरोनाचे भारतीय शेती क्षेत्रावरील परिणामया विषयावरडॉ. श्रीकांत कळमकर यांनी दिलेल्या भाषणाचा संपादित भाग. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सूर्यवंशी होते. वेब संवादाचे उद्घाटन प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले. कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. कैलास पाटील ,कार्यवाह- खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, अर्थसंवादचे संपादक डॉ. राहुल मोरे तथा डॉ. अजय दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा