‘मार्क्स’वादी पालक हो… !

0
30
प्रातिनिधिक छायाचित्र.

बऱ्याचदा आई ही मोठी ‘मार्क्स’वादीअसते. तिला ‘सोसायटी’तकोणाला नाक ऊंच करुन दाखवायचे असते किंवा कुणाचे नाक कापायचे असते तिचे तिलाच माहिती!कधी कधी बापही मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या खासगी शिकवण्यात आपल्या कच्च्या मालाला कोंबून मार्क्सचे उत्पादन घेण्याचा घाट घालताना दिसतो तर कधी कधी दोघेही (माओ व लेनिन बनून) मिळून पोरांच्या मागे ‘मार्क्स’साठी लागतात. बैलाला घाण्याला जुंपून तेल काढण्याचाच प्रकार! ते कोवळे जीव मात्र अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जातात!

संदीप बंधुराज

मुलांना शाळेत घातले की मुलांपेक्षा पालकांच्या मनात एक स्पर्धा सुरु होते. माझ्या मुलाला किंवा मुलीला सर्वात जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत. त्यासाठी त्या मुलांचे बालपण कोमेजून गेले तरी त्याची त्यांना तमा नसते. मी असे अनेक पालक बघितले आहे की, मुलांशी केवळ मार्क्सपुरतेच बोलतात. पाहुणे आले तरी मुलांना ‘किती मार्स्क मिळाले’ असाच प्रश्न विचारतात (मुलांना तो प्रश्न आणि पाहुणा अजिबात आवडत नाही, मी मात्र ‘मस्ती करतो/करते का’ असा मुलांच्या आवडीचा प्रश्न विचारत असतो!) अशा कट्टर ‘मार्क्स’वादी  पालकांमुळे आणि समाजामुळे अनेक मुलांना जगणे मुश्कील बनून जाते हे आपण अनेकदा अनुभवले आहे. बऱ्याचदा आई ही मोठी ‘मार्क्स’वादी असते. तिला ‘सोसायटी’त कोणाला नाक ऊंच करुन दाखवायचे असते किंवा कुणाचे नाक कापायचे असते तिचे तिलाच माहिती! कधी कधी बापही मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या खासगी शिकवण्यात आपल्या कच्च्या मालाला कोंबून मार्क्सचे उत्पादन घेण्याचा घाट घालताना दिसतो तर कधी कधी दोघेही (माओ व लेनिन बनून) मिळून पोरांच्या मागे ‘मार्क्स’साठी लागतात. बैलाला घाण्याला जुंपून तेल काढण्याचाच प्रकार! ते कोवळे जीव मात्र अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जातात!

मुळात शिक्षण हे कशासाठी घ्यायला हवे हेच न कळलेले अनेक पालक आहेत. ‘नोकरीसाठी शिक्षण आणि शिक्षणासाठी मार्क्स आणि मार्क्ससाठी घोकमपट्टी’ अशा चक्रात अडकलेले पालक व समाज निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘जो घोकमपट्टीत अव्वल तोच गुणवंत’ असा एक समज निर्माण झाला.

या देशाच्या सामाजिक रचनेचा इतिहास लक्षात घेता घोकमपट्टी करुन पोपटपंचीत कोण आघाडीवर होते हे लक्षात घेतले की ‘आपली शिक्षण व्यवस्था अशी का’ याचे उत्तर सापडेल. ज्यांचे पोटच केवळ घोकमपट्टीवर चालत होते त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील घोकमपट्टी सोईचीच. पण ज्यांच्या बापजाद्यांनी कधी पाठांतरावर लक्ष दिले नाही आणि केवळ आकलनावरच बाजी मारुन नेली त्यांच्यासाठी ही घोकमपट्टी कठीण झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात दहावी-बारावीच्या निकालांत ठराविक विद्यार्थीच बोर्डात, राज्यात पहिले येत होते. नंतरच्या काळात संधी मिळताच बहुजनांनीही घोकमपट्टीत आघाडी घेतली आणि राज्यात, बोर्डात चमकणारी नावे बदलत गेली. पुढे कालांतराने राज्यात, बोर्डात क्रमांक काढण्याची पद्धत बंद करण्यात आली. (या द्वारे ‘आपली मुले खचून जावू नये’ याची व्यवस्था पारंपरिक घोकमपट्टीदारांनी केली असे विश्लेषण माझे एक मित्र करतात.) पण घोकमपट्टी सुरुच आहे. खरंतर घोकमपट्टी हा शिक्षणाचा एक भाग आहे, हे नाकारता येणार नाही पण तो एकमेव भाग नाही हेही लक्षात घ्यायला हवे. पण अशाच प्रकारची शिक्षण व परिक्षापद्धती देशात असल्याने घोकमपट्टीला पर्याय उरलेला नाही.

आता बारावीचा निकाल लागला. दहावीचा लागेल. अपेक्षेप्रमाणे मुलींनी आघाडी मारली. ज्यांनी चांगले गुण मिळवले (केवळ या अर्थाने गुणवंत) विद्यार्थ्यां-विद्यार्थींनींचे अभिनंदन व कौतुक करायलाच हवे. त्यांची मेहमन कामी आली. पण मोठा वर्ग असा आहे की, जो त्या तुलनेत खूपच कमी गुण मिळवलेला आहे. काहीजण तर अनुत्तीर्णही झाले आहेत. मग त्यांकडे कोण लक्ष देणार? अभिनंदनाने प्रेरणा मिळते, पण जे कमी पडले (परिक्षेत गुण मिळवण्यात) त्यांच्याबाबत विचार केला तर त्यांच्यासाठी खूप मोठे संकट असते, हे लक्षात घ्यायला हवे. खऱ्या प्रेरणेची गरज त्यांना असते. ‘रंगलेल्या तोंडांचे मुके सर्वच घेतात’ असे एक संपादक म्हणायचे. पण ही काळवंडलेली तोंडे पाहायला हवीत. या काळोखातल्यांकडे लक्ष द्यायला हवे. त्यांनी उपलब्ध परिस्थितीत त्यांच्या सर्व क्षमतांचा वापर करुन जे काही गुण मिळवले त्याचे कौतुक व्हायला हवे.

कमी गुण मिळाले, किंवा नापास झाले म्हणून त्या मुलांच्या पालकांनी खचून जाण्याची गरज नाही आणि समाजाने नाके मुरडण्याचीही गरज नाही. या दोन्ही घटकांची तोंडे पाहिली की मुलेही खचून जातात. त्यांना आपण काही तरी घोर अपराध केला असे वाटते. त्यातून काही मुले चुकीची पावले उचलतात हे मागाहून उर पिटत बसणाऱ्या पालकांना कळत का नाही?

दहावी-बारावी किंवा कोणत्याही परिक्षेत मिळवलेल्या गुणांचे आणि जीवनात यशस्वी होण्याचा खूप काही संबंध नाही. परिक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास नसते. अशी अनेक उदाहरणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील उमेश खांडबहाळे हा विद्यार्थी इंग्लिश विषयात बारावीला नापास झाला होता. पुढे त्याने प्रयत्न केले. एक वर्ष नाशिकला दुध पोहोचविण्याचे काम केले. पण शेवटी बारावीच नाही तर यूपीएससीही पास केली. आज उमेश खांडबहाळे हे पश्चिम बंगालमध्ये आयपीएस अधिकारी आहेत. मध्यप्रदेशातील मनोज शर्मा हेही आयपीएस अधिकारी आहेत. ते तर हिंदी सोडून सर्वच विषयांत बारावीला नापास झाले होते. गुजरातमधील आयएएस अधिकारी नितीन संगवान यांनी तर आपली बारावीची गुणपत्रिका ट्विटरवर टाकली. त्यात त्यांना केमिस्ट्रीमध्ये ७० पैकी केवळ २४ गुण मिळालेले आहेत (पासिंगपेक्षा केवळ एक गुण जास्त). छत्तीसगढमधील अविनाश शरण यांना दहावीत ४४ तर बारावीत ६५ टक्के गुण मिळाले होते. त्यांनीही आपले गुण जगजाहीर केले. ओरिसातील प्रल्हाद मिना या रेल्वेत गँगमन म्हणून काम करुन जेमतेम पोट भरणाऱ्या युवकाने अपयश पचवत पचवत शेवटी आयपीएश होऊन दाखवलंच. हीच कथा पंजाबमधील आयपीएस आदित्य यांची. त्यांनी चक्क ३० वेळा परिक्षेत नापासाचा शिक्का सहन केला. एवढेच कशाला आज जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स हा शाळा सोडलेला अबोल व एकलकोंडा विद्यार्थी होता. सिनेकलाकार अक्षय कुमार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ६२ कोटी रुपयांच्या आयडी स्पेशल फूड प्रायव्हेट लिमिटेडचा मालक मुश्तफा हे सर्व घोकमपट्टी आधारित शिक्षणापुढे कमी गुणवंत ठरले. अनेकांनी दहावी-बारावी उत्तीर्ण केली नाही पण आज ही नावे जगातील यशस्वी माणसांच्या यादीत आहेत. आपल्या आजूबाजूला जरी  नजर टाकली तरी परिक्षेत नापास पण जीवनात यशस्वी अशी अनेक लोक दिसतील.  त्यामुळे पालकांनी, समाजाने केवळ ‘मार्क्स’वादी बनून विद्यार्थ्यांचे जीव घेणे बंद केले पाहिजे.

विद्यार्थ्यांनीही अजिबात खचून जावून चालणार नाही. स्वत:ला कमी समजू नका. जे काही गुण मिळाले आहेत ते तुमच्या मेहनतीचे आहेत. त्याबद्दल तुम्हीही अभिनंदनासच पात्र आहात. दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे काही आयुष्य नाही, हे तुम्हाला वरील उदाहरणांवरुन कळलेच असेल. हा एक टप्पा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपण कमी पडलो तर ठिक आहे. पुढच्या टप्प्यावर अधिक मेहनत घ्यावी म्हणजे झालं. सर्वात महत्वाचे आहे मेहनत घेणे, सातत्य ठेवणे. ‘मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाए’! ( हे वाक्य नितीन संगवान या आयएएस अधिकाऱ्याकडून ऐकलेय.)

 हेच की परिक्षेत गुण मिळवण्यासाठी मागे लागण्यापेक्षा पालकांनी शिक्षणातून चांगला माणूस घडतोय का हे पाहिले पाहिजे. परिक्षेत चांगले गुण घ्यायचे आणि प्रत्यक्ष जीवनात गुण उधळायचे हे काही योग्य नाही. कोल्हापुरातील एक विद्यार्थी जो स्कॉलरशिपमध्ये राज्यात दुसरा आला होता आणि दहावीत ज्याने ९४.६० टक्के गुण मिळवले होते. तो आज दहा घरफोड्या आणि दोन बाईक चोरण्याचा आरोपाखाली कैदेत आहे. एमएस्सी फिजिक्स फर्स्ट क्लास फर्स्ट झालेला एक गुणवंत दारु करिता वीस रुपये मिळावेत यासाठी गटार उपसताना मी पाहिलेला आहे. देशाला चांगल्या माणसांची गरज आहे. त्यामुळे पालकांनी केवळ ‘मार्क्स’वादी बनण्यापेक्षा चांगला माणूस घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी पालकांचाही नाईलाज होत आहे. आपल्या पाल्याच्या भवितव्याची चिंता पालकांना एवढे क्रुर होण्यास मजबूर करत आहे, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचेच अपयश आहे. वेगवेगळ्या विषायांचे आकलन होऊन त्याद्वारे आपली अंगभूत कौशल्ये विकासित करण्याची संधी शिक्षणाने दिली पाहिजे. मात्र या घोकमपट्टीच्या स्पर्धेत अनेक अंगभूत कौशल्य मातीमोल होताना दिसतात. त्यामुळेच पालकांना मार्क्सवादी बनावे लागते आहे.

सकस आहाराऐवजी फास्टफुडवर पिढी काही काळ जिवंत ठेवणे शक्य आहे पण जगवणे कसे शक्य होईल? घोकमपट्टीवर आधारित शिक्षण पद्धती बंद करुन त्याऐवजी आकलनावर आधारित शिक्षण पद्धती सुरु करायला हवी. विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या शिक्षण पद्धतीपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वविश्वास निर्माण करणारी शिक्षण पद्धती अवलंबायला हवी. नोकरदार तयार करणाऱ्या शिक्षण पद्धतीपेक्षा चांगली माणसे घडवणारी शिक्षण पद्धती असायला हवी. जी पूर्वी नालंदा विद्यापीठात होती, जी आज जगभरात अनेक ठिकाणी आहे. काय सरकार म्हणून जी व्यवस्था आहे तिची ही जबाबदारी नाही? मानव संसाधन विकास करणे म्हणजे दुसरे काय असते?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा