मला पण आवडेल…

0
56
प्रातिनिधिक छायाचित्र.

आवडेल मलाजातीला फक्त दोन समीकरणांमध्ये कोंबून सांगायला: ‘आरक्षण’ आणि ‘दलित अनुभव’. आरक्षणाबद्दल थोडं गोड बोललं की झाले पुरोगामीआणि दलित आत्मकथनांना शाब्बास म्हणले की झाले तुम्ही अँटी-कास्ट. पण कोणाला माझे “दलितत्व” पटवून द्यायला मी काही माझे आयुष्य नंगे करून जगासमोर नाही मांडणार आता. दलित आत्मकथानांना एक मर्यादित आयुष्य होते. मर्यादित उपयोग होता आणि तो आता संपला, म्हणजे केव्हाचा संपला. आता वेळ आहे स्वतःच्या लेखणीने शोषकांवर लिहायची.फक्त आजूबाजूची डोळ्यासमोरची लक्षणे यांना जग न मानता अख्ख्या व्यवस्थेवर कुऱ्हाड घालायची!

  • गौरव सोमवंशी

मला पण खूप आवडेल स्वतःला युनिव्हर्सल/युरोपियन विचारांनी प्रभावित झालेलं सांगून प्रत्येक वादामध्ये तटस्थ भूमिका घेऊन दोघांपेक्षा अकलेने वरचढ दाखवणं. पाश्चिमात्य विचारवंतांचे मानवतावादी वाक्य पोस्ट करणं, ‘शेवटी सगळे सारखेच आणि सगळे प्रयत्न अर्थहीन’ या नीहीलिस्ट घोषवाक्यावर प्रत्येक वाद संपवून निसटून जाणं. आवडेल मला सावित्रीमाई, बमा, व ‘सावरी’ वेबसाईट, आणि अनेक अनेक बहुजन महिलांचे लेख बाजूला करून अमेरिकन ब्लॅक फेमिनिस्टचे लेख पोस्ट करणं. डार्विनच्या उत्क्रांतिवादावर थोडं ज्ञान पाजळून सगळे शोषण वगैरे हे कसे अपरिहार्य आहे असं सांगत फिरणं (हिटलर भाऊ ने केलं पण). इतिहासातील कोणता एक प्रसंग वाकडा-तिकडा करून सांगणं की आजचे शोषित उद्याचे शोषक बनतील म्हणून सगळं काही व्यर्थ आहे हे सांगून स्वतःला दीड-शहाणा दाखवणं त्या विजय तेंडुलकर सारखं (‘कन्यादान’). किंवा मनुस्मृतीला शिव्या देत हळूच “आजचे” सगळे खापर दबलेल्या समाजावर फोडणं त्या नरहर कुरुंदकर सारखं.

मला पण आवडेल ‘बॅलन्सवादी’ भूमिका घेऊन जे माझ्या भूमिकेमुळे लहानपणीचे/कॉलेज/ऑफिसचे दुरावलेले मित्र आहेत त्यांना परत इम्प्रेस करणं. बॅलन्सवादी म्हणजे की स्वतःच्या पोराने काही झोल केला की त्याला कानाखाली मारणे, पण विश्वातील संतुलन अबाधित राहावे म्हणून बाजूवाल्याच्या मुलाला सुद्धा एक कानाखाली ओढणे.

आवडेल मला की फुलेंनी जे लिहून ठेवलंय की ज्ञान निर्मितिचा अनैतिक अधिकार आणि त्याचा असलेला सामाजिक/राजकीय/आर्थिक वर्चस्वासोबत असेलला संबंध हे मिशेल फुकोच्या अवघड शब्दात सांगणं फुलेंना बाजूला सारून. बाबासाहेबांचे आर्थिक विश्लेषण विसरून थॉमस पिकेटीच्या नावाने तीच गोष्ट सांगणं, आवडेल की.

शिक्षण आणि थोडीफार आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे जे काही थोडं ‘जात चोरून’ वागायचं स्वातंत्र्य मिळतं (ते क्षणभंगुर का असेना) त्यामध्ये मस्त मिरवणं. चोमस्कीचं “कंसेंटचं” कसं उत्पादन केलं जातं यावर मस्त पेपर लिहून पाठवता येईल छापायला, हे विसरून की बाबासाहेबानी त्यांच्या शेवटच्या पुस्तकात “डिसेंट” सुद्धा कशी शासक वर्गच बनवतो यावर लिहून ठेवलंय.

आवडेल मला फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह आणि फोर्थ वेव्ह स्त्रीवादावर बोलणं, सिमोनपासून अगदी एमा वॉटसनवर पोस्ट करणं. मेल फेमिनिस्ट असणं सध्या फॅशनमध्ये आहे ना (त्यांना आता पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा नीट पोलखोल करून “ब्रोशलिस्ट” नावाने चिडवणं सुरू झालं आहे, तो वेगळा विषय.) असं करत असताना खूप आरामात मी विसरू शकतो की भारतातील स्त्रीवरील बंधने ही जातीच्या साखळ्यापासून कशी बनली आहेत, किंवा हे पण विसरेल की पाश्चिमात्य स्त्रीवादाचा जश्याच्या तश्या इम्पोर्ट करणे म्हणजे फक्त आणि फक्त ब्राह्मण-सवर्ण स्त्रियांचे सबलीकरण, इतरांचे काहीच नाही.

आवडेल मला, जातीला फक्त दोन समीकरणांमध्ये कोंबून सांगायला: ‘आरक्षण’ आणि ‘दलित अनुभव’. आरक्षणाबद्दल थोडं गोड बोललं की झाले पुरोगामी आणि दलित आत्मकथनांना शाब्बास म्हणले की झाले तुम्ही अँटी-कास्ट. पण कोणाला माझे “दलितत्व” पटवून द्यायला मी काही माझे आयुष्य नंगे करून जगासमोर नाही मांडणार आता. दलित आत्मकथानांना एक मर्यादित आयुष्य होते. मर्यादित उपयोग होता आणि तो आता संपला, म्हणजे केव्हाचा संपला. आता वेळ आहे स्वतःच्या लेखणीने शोषकांवर लिहायची. फक्त आजूबाजूची डोळ्यासमोरची लक्षणे यांना जग न मानता अख्ख्या व्यवस्थेवर कुऱ्हाड घालायची.

आवडेल मला की इकडच्या १७ गटांवर १७ वेळा पोस्ट टाकून त्यावरच बोलायचं. “इकडचे सुद्धा कसले खोटे आंबेडकरवादी आणि तिकडचे काही लोक किती चांगले” या एकच मंत्राचा जप करत स्वतःला सगळ्यांच्या वर जाऊन बसवायचं, आवडेल मला.

आवडेल मला सेक्युलर बनून फक्त धर्मावर बोलणे, त्यावर कविता लिहिणे, भाषण देणे, कारण तो सगळ्यांना परवडणारा विषय आहे. ‘अमर अकबर अँथनी’ सारखं सगळं काही हे सुपरहिट ठरेलच पण अमर हा ब्राह्मण सवर्ण की बहुजन, अकबर का अश्रफ की पसमांदा मुस्लिम, आणि अँथनी हा सीरियन ख्रिश्चन की दलित ख्रिश्चन, असं काही विचारलं की पिच्चर गेला मग सेन्सरच्या चड्डीत, मग तुम्ही “आय” लावा की काढा तो काही रिलीज होत नाही.

मला हे सगळं करायला आवडेल पण हे करायचा मोह मी आवरतो कारण की काय आहे ना, तुम्हाला काही चुटकीभर जरी बदल घडवायचा असेल तर “बाजू” घ्यावी लागते. “न्यूट्रल” बाजू नसते. शोषकवर्गाची एक खासियत अशी आहे की तुम्ही जर ठामपणे आणि स्पष्टपणे त्या विरोधात नाही उभे राहिलात आणि तटस्थ किंवा मध्यम मार्ग शोधत बसलात तरी त्याचा फायदा शोषकवर्गालाच होतो.

आयडेंटिटी ही लादलेलीच असते, पण ती न लपवता तिला धरून उलटं करून अंगावर पांघरूण जगात खुलेआम वावरणं म्हणजे थोडा तरी व्यवस्थेला तडा देणं. त्याहीपेक्षा चांगलं म्हणजे ‘आयडेंटिटी’ मध्ये शोषकाला ओढून आणणं, त्यावर लिहिणं.

मग २०२१ मध्ये आजतोवर केलेल्या चुका, मुद्दामून किंवा अनावधानाने, यांच्या पासून शिकून स्वतःला थोडं धीर द्यायचा ध्यास मी घेतो. आंबेडकरवादापासून ते प्रत्येक दबलेल्या समाजापासून शिकायची शपथ घेतो (शिकवायची अतिघाई न दाखवता). हे सगळं करायची हिम्मत होते कारण सोशल मीडियावर मी अनेक जणांना हे करतांना पाहतोच. तुम्हीच माझे हिरो/मार्गदर्शक आहात, त्यापेक्षा कमी नाही.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

साभारः राऊंडटेबल इंडिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा