एक रुपयाची अब्रू!

0
125
छायाचित्रः प्रशांत भूषण यांचे ट्विटर हँडल.

एक रुपयाचाच दंड द्यायचा होता तर इतके दिवस हे प्रकरण चर्वण करण्यासाठी लाखोंचा चुराडा का म्हणून केला?, असा प्रश्नही या व्यवस्थेत उपस्थित होत नाही. या एक रुपयाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यात महत्वाचा प्रश्न हा की, यापुढे एक रुपयाच्या किंमतीवर कुणाचीही अब्रू काढता येणार का? आणि अशीच अब्रू या पुढे कुणी कुणाची काढली तर हा निवाडा सुप्रीम आहे, पायवाट आहे असे समजून या पुढील खटल्यात अपराधी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला फक्त एक रुपयाच दंड दिला जाणार का? का फक्त अपराधी अभिजन असेल तरच एक रुपया?

आर.एस. खनके

काल आपल्या देशात एक ऐतिहासिक निवाडा झाला. ऐतिहासिक अनेक अर्थाने. त्यातील एक म्हणजे एक रुपयाचा दंड हा देखील ऐतिहासिक निकाल. त्यासाठी तीन विद्यमान न्यायाधीशांनी ८२ पानी निकाल जाहीर केला. आणि गेली कित्येक दिवसांचा गलबला एकदाचा निकाली लागला.

ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्या विरोधात हा मान-अवमान खटला स्यूमोटो प्रकारातला. प्रशांत भूषण यांच्याच ट्वीटमध्ये नमूद अनेक महत्वाच्या समस्यांवर कामकाज होवून निकाल येण्याची गरज असताना कोण कुणाबद्दल काय म्हणतेय याला प्रतिष्ठा देत हा खटला देशभर गाजला. देशाला आज नको त्या असंबद्ध विषयांवर चर्वण आणि कथ्याकुट करण्याचे जे अंगवळणी पडलेय तेच या संस्थेत प्रतिष्ठेचे झाले तर नवल कसले म्हणायचे?

एका वकीलाने एका पदासीन व्यक्तीला काही सूचित करण्यासाठी आपली अभिव्यक्ती वापरली तर मुळात बिघडलेच कुठे? हा सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न. मात्र या सर्व प्रकरणातून आजही अनुत्तरीत राहिला आहे. भूषण यांच्या माध्यामतून लोकहो तुमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नापेक्षा आणि अभिव्यक्तीपेक्षा आमची (सांभाच्या पिंडीवर बसलेल्यांची) पत मोठी आहे, असे मात्र या सर्व प्रकारातून रुजवण्याचा प्रयत्न झाला. अशा अहमहमिकेने कुठल्याही संस्थेची उंची, मान-मर्यादा आणि सन्मान वाढत नाही हे अनेक वेळा आपल्याकडील धुरिणांनी आणि देशोदेशीच्या प्रतिष्ठित न्यायव्यवस्थेने प्रसंगपरत्वे देशाला सांगितलेले आहे.

एक रुपयाचाच दंड द्यायचा होता तर इतके दिवस हे प्रकरण चर्वण करण्यासाठी लाखोंचा चुराडा का म्हणून केला?, असा प्रश्नही या व्यवस्थेत उपस्थित होत नाही. याला मुक्त आणि स्वस्थ संवाद अस्तित्वात आहे असे म्हणता येत नाही. या एक रुपयाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यात महत्वाचा प्रश्न हा की, यापुढे एक रुपयाच्या किंमतीवर कुणाचीही अब्रू काढता येणार का? आणि अशीच अब्रू या पुढे कुणी कुणाची काढली तर हा निवाडा सुप्रीम आहे, पायवाट आहे असे समजून या पुढील खटल्यात अपराधी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला फक्त एक रुपया एवढाच दंड दिला जाणार का? का फक्त अपराधी अभिजन असेल तरच एक रुपया?

वरकरणी हा खटला प्रशांत भूषण यांच्या नजरेतून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा म्हणून लढला गेला. तर याचिकाकर्ता आणि भूषण यांच्या ट्वीटवरून दखल घेणाऱ्या व्यवस्थेला स्वसन्मानाचा लढा वाटला आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई झाली. असे अभिजन चष्म्यातून दिसत असले आणि माध्यमांतून तसे दर्शवले गेले असले तरी या सरावलेल्या परिघाबाहेर जावून त्याकडे सामाजिक चौकटीतून पाहिल्यास मात्र हे चित्र तसे बिलकुल नाही आहे.

प्रशांत भूषण यांना या प्रकरणात जालीम अशी काहीही शिक्षा होणार नाही, असे भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास असणारे आधीपासूनच सांगत होते. त्यांची ही व्यवस्थेबाबतची जाण निवाड्याच्या प्रक्रियेपेक्षा अधिक वास्तववादी, अर्थपूर्ण आणि भविष्यवेधी ठरली. याचा अर्थ कायद्याचा आणि नियमांचा कितीही कथ्याकुट केला तरीही या निवाड्यात लॉ मॉडेलपेक्षा सामाजिक मॉडेल प्रभावी ठरणार याचा या जाणकारांना आलेला पक्का अंदाज! हा अंदाज का आला असेल याचा मागोवा घ्यावयाचा झाल्यास त्यासाठी काहीवर्षे मागे जावून जस्टीस कर्णन यांच्या प्रकरणाची आठवण करावी लागेल.

आज जी कलमे प्रशांत भूषण यांना आरोपी ठरवण्यासाठी लावली होती, तिच कर्णन यांना लावण्यात आलेली होती. मात्र कर्णन यांचा लढा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठरला नाही आणि त्यांना झालेली शिक्षाही एक रुपया दंडाएवढी साजूकनाजूक सुनावली गेली नाही. भूषण यांचे म्हणणे पटलावर येण्यापूर्वीच माध्यमांत येत होते, तर कर्णन यांचे विधानही माध्यमांत येवू नये, यासाठी खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.

या मान-अवमान प्रकरणाकडे देशी सामाजिक मॉडेलच्या अंगाने बघितल्यास भूषण यांचे प्रकरण महाभारत या महाकाव्यातील दोन सत्ता पक्षातला वर्चस्वाचा खटला म्हणून पाहता येईल. अशा प्रकरणांची खलबते मात्र देशाला वेठीस धरून त्यातल्या सत्यांशाधारे प्रश्न देशाचा आहे असे बिंबवताना सोशल सुपरमसीचे मॉडेलही रुजवत असतात. त्यात यक्ष, गंधर्व आणि एकलव्य या प्रकरणाच्या परिघाबाहेर आहेत. म्हणून अशा स्वसंरक्षित संघर्षाच्या परिघात कुणीही खलनायक ठरत नाही. म्हणून यातील अब्रूची किंमत एक रुपया!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा