कुणाच्या म्हशी….?

0
20

कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा, जीडीपीचा कमी होत चाललेला आकडा, बेरोजगारीचा वाढलेला आकडा आणि सरकारी कंपन्यांचा कमी होत चाललेला आकडा, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि शिक्षण व्यवस्थेने केलेला पोबारा वगैरे वगैरे मुद्यांकडे कुणाचे लक्ष गेले नाही. हे किती बरे झाले. नाही तर उगाचंच लोक चिंता करत बसले असते, आता कसे होणार?.उगाचंच स्वहत्या वाढल्या असत्या. एवढ्या जणांचे जीव एकट्या सुशांतने वाचवले.त्यात रियाने भर टाकली आणि शेवटी कंगनाने रंगत आणली. यालाच तर म्हणतात कोरोना ते कंगना व्हाया सुशांत. कोरोनाच्या काळात लोकांना चिंतामुक्त करणे, त्याचे दु:ख-दर्द विसरायला लावणे ही केवढी मोठी राष्ट्र सेवाच आहे ना?

  • संदीप बंधुराज

‘कुणाच्या म्हशी आणि कुणाक उठाबशी’ अशी एक म्हण तळकोंकणात वापरली जाते. याचा सरळ सरळ अर्थ असा की, ज्याचा काही संबंध नाही त्याच्यामागे एखादे काम लागावे. आज आपल्या देशात, विशेषत: महाराष्ट्रातील जनतेची अशी अवस्था झाली आहे!

मी खरे तर सुशांतसिंग राजपूताच्या मृत्यू प्रकरणाभोवती फिरणाऱ्या गोष्टींवर काही भाष्य करायचे नाही असेच ठरवले होते. कारण तो काय सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाशी संबंधित महत्वाचा विषय नव्हता. कंगना राणावतला मी मनुवादी व्यवस्थेत अडकलेल्या आपल्या कुटूंबियांशी पंगा घेतलेल्या व व्यवस्थेवर लाथ मारुन घर सोडून बाहेर पडणाऱ्या धडाकेबाज अभिनेत्री म्हणून ओळखत होतो. मला त्यांचे कौतुकही वाटत होते. मी त्यांची एक मुलाखतही शेअर केली होती. तिनेही सुशांतसिंग प्रकरणात उडी घेतली तरीही मी गप्प राहायचे ठरवले होते. पण काय करणार अति झाले की गायसुद्धा मान वळवतेच ना! त्यात मी माणसाचा पुत्र! पहिली प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे ‘कुणाच्या म्हशी आणि कुणाक उठाबशी!’

लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर पायपीट करुन आपल्या घरी परतले. अनेकांचे हाल झाले. शासकीय विकासाचा पिसारा फुलवलेल्या मोराचा पार्श्वभाग उघडा पडला. आणि ‘छीं थू” होवू लागली. मुंबईहून मोठ्याप्रमाणात यूपी- बिहारकडे लोक निघाले. दिल्लीतूनही तीच अवस्था दिसत होती. त्यामुळे पोटात आग आणि डोक्यात राग घातलेले मजूर आपला राग काढलीत असा अंदाज व्यक्त केला जावू लागला होता. तेवढ्यातच मूळ बिहारच्या सुशांतसिंग राजपूतने मुंबईत कथित स्वहत्या केली. ही स्वहत्या सुरुवातीला एका गुणी कलाकाराने केली म्हणून युवक वर्गांत अस्वस्थता पसरली. पण हळू हळू मेलेल्या सुशांतला वाचा फुटली. त्याचे भूत काही लोकांची झोप उडवू लागले. ‘अहो, काय कोरोना कोरोना करत बसलात, काय थाळ्या बडवत बसलात, काय दिवे मालवत बसलात, याने तुम्हाला काय मिळणार आहे? बिहारमध्ये येणाऱ्या निवडणुकांत मला न्याय द्या आणि असा चिखल कालवा की कमळ फुललेच पाहिजे. माझ्या मढ्यावरचे लोणी कोण खाणार?,असेच जणू हे भूत ओरडले आणि कर्तेधर्ते खडबडून जागे झाले.

 सुशांतच्या वडिलांनी साहाजिकच आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला. अगदी तसाच-जसा रोहित वेमुलाच्या आईने केला होता. पण तिला काय किंमत! येवून जावून ती पडली मागास! सुशांतकडे तरी स्वहत्या करण्यासाठी स्वत:चा अलिशान फ्लॅट होता, तिच्या पोराकडे साधी हॉस्टेलची रुमही नव्हती!

सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलीसांत तक्रार केली त्यावेळी आपलं पोरगं ड्रगिस्ट सिद्ध होईल याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. विशेष म्हणजे यावेळी उदार बिहार पोलिसांनी ‘जहां क्राईम हुआ है, वही पर जाओ’ असा पारंपारिक सूर काढला नाही. (किती ही तत्परता!) तक्रारीतून मग रिया चक्रवर्ती तडाख्यात सापडली.  रियाची मिडीयाच्या परंपरेला साजेशी ट्रायल सुरु झाली. गोदी मिडीयाने तर तिला ‘राष्ट्रीय डायन’ सिद्ध केले. त्यात महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरेचेही नाव घेतले गेले आणि मग बिहारमध्ये धुरळा उडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील अर्ध्यावरती मोडलेल्या डावाचा वचपा काढण्यासाठी आयती संधी हातात आली. ती सोडेल तर तो राजकारणातील महामुर्खच! त्यामुळे ती संधी राष्ट्रीय परंपरेला साजेशी साधली जावू लागली.

न्या. लोया व भाजपचे नेते तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होऊनही कदाचित त्या व्यक्ती तेवढ्या ‘महत्वा’च्या नसल्याने सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातून बाहेर काढला गेला नाही. मात्र या अत्यंत महत्वाच्या प्रकरणात सीबीआयची इंट्री झाली आणि शेवटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या हाती रिया लागली वगैरे वगैरे सर्व कथानक एखाद्या लांबलेल्या वेबसिरीज सारखे! (कहा से शुरु कहा पे खतम). बिहारमध्ये सुशांतसाठी न्याय देण्याबाबत प्रचारी साहित्य तयार करण्यात आले! पण यातून फारसे काही हाती लाभेनासे झाले. तवा चांगला तापल्याशिवाय भाकरी कशी भाजणार? मग इंट्री झाली कंगना मॅडमची!

कंगनाने बॉलिवुडमधल्या अनेकांना पाणी पाजलेलं. तिला पद्मश्रीही मिळालेला. तिनेही या प्रकरणात नाक खुपसलं आणि मग या ‘देश की बेटीच्या’ सुरक्षेची जबाबदारी साहाजिकच दयाळू भारत सरकारवर पडली. कंगनाने ‘मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नाही’ असे म्हटले. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण व त्यानंतर घडलेल्या बंदमध्ये मुंबई व पुणे पोलिसांनी ज्याप्रकारे आंबेडकरी जनतेला प्रताडीत केले त्यावेळी ती लोकंही हेच म्हणत होती. त्यामुळे कंगनाने तसे म्हटले त्याला अगदी हलक्यात घेता आले असते पण ते जरा तिढ्यात घेतलं गेलं.

 महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नाही तर येवू नका इकडे’ असं म्हटलं. आता कुणी असे बोलते का? उलट अनिल देशमुखांनी ‘या बिनधास्त या, काही घाबरु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा वडिलकीचा विश्वास द्यायला हवा होता, पण त्यांनी संधी गमावली. ‘तुम्हाला भारतात असुरक्षित वाटते तर मग पाकिस्तानात जा’ असे जे भाजपवाले, त्यांची भक्त मंडळी व गोदी मिडीया म्हणतात त्यातलाच हा प्रकार झाला ना? पण यावेळी ही मंडळी शहाणी झाली त्यांनी कंगनांच्या मदतीला धाव घेतली. त्या जोरावर कंगनाने डायलॉगवर डायलॉग फेकले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि बरंच काही बरळली! मग संजय राऊत गप्प कशाला बसलीत? त्यांनी जे शब्द वापरले ते त्यांच्यावरच उलटले. काय तर म्हणे ‘कंगना यांच्या वाचाळपणामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला. ‘अहो, राऊत साहेब हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे, कुणाच्या तरी वायफळ बडबडीने त्याचा अपमान कसा होईल? प्रतिमा कशी डागळेल? अहो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते!’, असे जोरजोरात सांगावसे वाटले.

पण तोपर्यंत धुरळा उडाला होता. अमित शहांना खूपच चिंता वाटली. त्यांनी कंगनाच्या मागणीची वाट न पाहता, मनकवडेपणा दाखवून व प्रसंगावधान ठेवून त्वरित ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देवू केली. (अहाहा, काय हे राष्ट्रीय कार्य!) अशीच सुरक्षा त्यांनी अर्णव गोस्वामी, कपिल मिश्रा या आपल्या लख्तेजिगरना दिली आहे. लढाई लढायची तर आपले प्यादे सुरक्षित हवेतच ना!

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनुसूचित जातीच्या अनेक मुलींवर बलात्कार होतात. त्यांच्या हत्या होतात. त्यांचे अपहरण होते पण त्यांना कोण देईल सुरक्षा? त्या जगल्या काय नि मेल्या काय, त्यांची औकातच काय?

आता इकडे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बीएमसीचे डोके फिरले आणि त्यांनी कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवला. केवढा हा अन्याय ! अनधिकृत असले म्हणून काय झाले? त्या रिया चक्रवर्तीला अटक करताना लेडिज पोलीस नव्हती म्हणून काय झाले, कंगना ‘भारत की बेटी’ आहे, तिच्या बांधकामावर असा हल्ला करणे योग्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील अनधिकृत झोपड्या तोडण्याचा आदेश दिला त्याचप्रमाणे बिच्चाऱ्या कंगनाचे घरटे तोडण्याचा आदेश दिला जाईल की काय असे वाटून माझ्या पोटात गोळाच आला. पण बरे झाले की उच्च न्यायलायने त्वरित स्टे दिला. कंगनाच्या पाठीराख्यांना आणखी एक कोलीत सापडले. त्यांनी ट्विटर, फेसबुक अशा समाज माध्यमांवरुन आग लावण्याचे काम सुरु केले. असहाय्य बिचाऱ्या कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर हल्ला करुन अत्याचार केला गेला याची चीड भक्तांना एवढी आली की, त्यांच्यातला माणूस जागा झाला (हा २०१४ पासून झोपला होता असे म्हणतात) त्यांनीही कंगनाच्या सुरात सूर मिळवून मुंबई पाकव्याप्त काश्मीर बनल्याचा सूर लावला. सरकार हे गुंडगिरी करत आहे, स्त्रिया सुरक्षित नाहीत वगैरे वगैरे पोस्ट केल्या. त्यांची ही न्यायप्रियता पाहून मी तर गहिवरुनच गेलो. अशाच पोस्ट गोहत्येवरुन झालेल्या अल्पसंख्यांकांच्या हत्या, जामिया-इस्लामिया विद्यापिठावर दिल्ली पोलिसांकरवी करण्यात आलेला हल्ला, जेएनयूमध्ये दिल्ली पोलिसांच्या समक्ष विद्यार्थ्यांवर गुंडांनी केलेला बेछूट हल्ला, एनआरसी-सीएए विरोधी आंदोलन करणाऱ्यांवर  केलेला गोळीबार व त्याही पुढे जावून खुलेआम धमकी देणारे कपलि मिश्रा, अनुराग ठाकूर या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबाबतही त्यावेळी  विरोधकांनी केल्या होत्या. पण त्यांनी काही दिल्लीला पाकव्याप्त काश्मीर वगैरे काही म्हटले नव्हते म्हणा. त्यातले काही देशद्रोहीही ठरले!

आता कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला तर त्यातही काही वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कारण त्यांच्या स्क्रिप्टमध्ये जसे असेल तसेच बोलणार ना? अर्थात अशीच स्क्रिप्ट अर्णव गोस्वामीकडेही आहे. तसेही आपल्याला शहाणपणाची अपेक्षा कोणाकडून करावी हे कळले पाहिजे ना!

खरे तर या सर्व राजकीय गोष्टी घडतच राहातात. त्यात सर्वसामान्य माणसाला उगाचंच वेठीस धरले गेले, कुणाच्या म्हशी, कुणाक उठाबशीप्रमाणे. या सर्वांत एक गोष्ट मात्र खूप चांगली झाली की, कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा, जीडीपीचा कमी होत चाललेला आकडा, बेरोजगारीचा वाढलेला आकडा आणि सरकारी कंपन्यांचा कमी होत चाललेला आकडा, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि शिक्षण व्यवस्थेने केलेला पोबारा वगैरे वगैरे मुद्यांकडे कुणाचे लक्ष गेले नाही. हे किती बरे झाले. नाही तर उगाचंच लोक चिंता करत बसले असते, आता कसे होणार?. उगाचंच स्वहत्या वाढल्या असत्या. एवढ्या जणांचे जीव एकट्या सुशांतने वाचवले. त्यात रियाने भर टाकली आणि शेवटी कंगनाने रंगत आणली. यालाच तर म्हणतात कोरोना ते कंगना व्हाया सुशांत. हे घडवून आणण्यात ज्यांचा कुणाचा सहभाग आहे ना त्यांना खुप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात.  कोरोनाच्या काळात लोकांना चिंतामुक्त करणे, त्याचे दु:ख-दर्द विसरायला लावणे ही केवढी मोठी राष्ट्र सेवाच आहे ना? शेवटी काय हो, लोकांनी कसे फक्त कर्म करायचे, फळाची अपेक्षा करायची नाही. ते कुणा दुसऱ्याला चाखू दे! हे कंगना आणि अन्यांनीही लक्षात घेतलेले बरे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा