आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींचा सौदा, वानखेडेंना मिळणार होते ८ कोटीः पंचाचा गौप्यस्फोट

0
1231

मुंबईः मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आणि या डीलमधील ८ कोटी रुपये एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा खळबळजनक दावा या प्रकरणातील साक्षीदार के.पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ पार्टी प्रकरणात पंच होता. प्रभाकरने स्वतःचा व्हिडीओ व्हायरल करून खळबळ उडवून दिली आहे.

एनसीबीने क्रूझ पार्टीवर धाड टाकली, त्यात प्रभाकर साईल हा क्रमांक एकचा पंच आहे. या प्रकरणात आपल्याकडून पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. धाडीच्या दिवशी किरण गोसावीने प्रभाकर साईललला यलो गेटवर बोलावले आणि त्यानंतर गोसावीला त्याने फोनवर बोलताना ऐकले. या सर्व प्रकरणामुळे प्रभाकर साईलच्या जीवाला धोका होता म्हणून तो दहा-बारा दिवस सोलापूर येथे परिचिताकडे जाऊन राहिल्याचे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, किरण गोसावीकडे मी २२ जुलैपासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कावईच्या अगोदर अहमदाबादवरून निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफिसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला होता… रात्रीतून दोनवेळा त्यांची बैठक झाली. साडेचारला एनसीबीहून आम्ही लोअर परेलला निघालो. तेथे ब्रीजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठीमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत शाहरूख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर किरण गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत त्यावेळी काय झाले ते मला समजले नाही. गाडीमधून त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले, ‘उनको बोल २५ करोड मे डील करने के लिए. १८ करोड में फायनल कर. ८ करोड वानखेडे को देना है १० हमको बाटके लेना है’, मी एवढेच त्यांचे फोनवरचे संभाषण ऐकले, असे प्रभाकर साईल या व्हिडीओत म्हणतो. सॅम हा शाहरूख खान आणि गोसावी यांच्या मधला कोऑर्डिनेटर होता, असा दावाही प्रभाकर साईलने केला आहे.

प्रभाकर साईलने किरण गोसावीचा लपून व्हिडीओ केला. त्यात किरण गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावले असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आपणच केल्याचे प्रभाकर साईलने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. या व्हायरल व्हिडीओची अजून खातरजमा होणे बाकी आहे. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

 पोलिसांनी स्वतःहून दखल घ्यावी- राऊतः दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. एनसीबीकडून साक्षीदार असलेल्या व्यक्तीची एका कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा प्रकार धक्कादायक आहे. आर्यनला सोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराची पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली पाहिजे, असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ट्विट टॅग केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा