वंचित बहुजन आघाडी फुटलीच, एमआयएम राज्यात स्वबळावर ७४ जागा लढणार

1
345

औरंगाबाद/मुंबईः

एमआयएम-वंचित बहुजन आघाडीची युती कायम आहे. आम्ही जागांची यादीही परस्परांना दिली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सांगत असतानाच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचे एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दिन ओवेसी यांनी स्पष्ट केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचितसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत, जलील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयएमने ७४ जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मांडलेली भूमिका हीच एमआयएमची भूमिका आहे. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.त्यांनी घेतलेला निर्णय हाच एमआयएमचा अधिकृत निर्णय आहे, असे ओवेसी यांनी स्पष्ट केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी- एमआयएमचा काडीमोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओवेसी यांचे स्पष्टीकरण येण्याआधीच औरंगाबादमध्ये जलील यांनी मंगळवारी मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.  ते म्हणाले की, टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आता कोणासोबत युती नसल्यामुळे किती जागांवर उमेदवार लढवायचे यावर बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. एमआयएमसोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा त्यांनी केला. दलित समाज किंवा अन्य कोणत्या समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे. हे कोणी समजू नये असेही जलील म्हणाले. वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमची आघाडी झालेली नसल्याने अनेक पक्षातील नेत्यांनी एमआयएमशी उमेदवारीशी संपर्क करीत असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.

काय म्हणाले ओवेसी…
“इम्तियाज जलील यांचे स्टेटमेंट पक्षाचे अधिकृत स्टेटमेंट आहे. ते त्यांचे वैयक्तिक स्टेटमेंट नाही. पक्षाची महाराष्ट्र शाखा किती जागा लढवायच्या, कोणाशी युती करायची, याबाबतचा निर्णय घेईल.”

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. त्यावेळी या आघाडीला लक्षणीय मतदान झाले होते. इम्तियाज जलील निवडूनहीआले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून एमआयएम वंचित बहुजन आघाडीसोबत लढणार नसल्याचे जलील यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी एमआयएमने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.

आता ‘वंचित’मध्ये आपला घेण्यावर खलबते

एमआयएमसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर वंचितने आम आदमी पक्षासोबत युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काही प्रमुख पदाधिकारी यांची आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्‍यांसोबत सोमवारी बैठक झाली. मुंबईच्या दादरमधील आंबेडकर भवनात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. आपकडूनही वंचितबरोबर जाण्याचे संकेत देण्यात आल्याने लवकरच राज्यात वंचित आणि आपचा नवा प्रयोग पाह्यला मिळणार आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा