आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना दिवाळीपूर्वीच मिळणार चार महिन्यांचा वाढीव मोबदला!

0
105
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांचा वाढीव मोबदला दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. या चार महिन्यांचा आशा स्वयंसेविकांना ८ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १२ हजार रुपये वाढीव मोबदला एकत्रित दिला जाणार आहे. हा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. या संबंधीचा शासन निर्णय आरोग्य विभागाने आजच जारी केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय २५ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २०००  व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै  ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७ कोटी ५६ लाख कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा