निवडणूक निकाल २०२२: मतमोजणीच्या कलात उत्तर प्रदेशात भाजप, पंजाबमध्ये आपला आघाडी

0
142

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या प्रारंभिक कलानुसार उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये भाजप तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मोठी आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. गोव्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे तर मणीपूरमध्येही भाजप सर्वात पुढे आहे.

पाच राज्यांतील मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला. निवडणुका झालेल्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणीपूर या राज्यांचा समावेश आहे. सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागले आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी २०२ संख्याबळाची आवश्यकता आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळेल असे अंदाज आधीच वर्तवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांचे प्रारंभिक मतमोजणीचे कल हाती आले असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. मात्र भाजपपुढे गेल्या वेळी मिळवेल्या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशातील या निवडणूक निकालांचा प्रभाव २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरही होणार आहेत. त्यामुळे गेल्यावेळी स्वतःच्या बळावर मिळवलेल्या ३१२ जागांपैकी यापैकी भाजप किती जागा स्वतःकडे राखण्यात यशस्वी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील मतमोजणीचे जे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजप २६७, समाजवादी पक्ष १२४, बसप ५, काँग्रेस ४ तर अपत्र ३ जागांवर आघाडीवर आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची (आप) सुनामी आल्याचेही मतमोजणीच्या प्रारंभिक कलात पहायला मिळत आहे. सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि अकाली दलाला पिछाडीवर टाकत आपला मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसू लागले आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासात आपने आतापर्यंत ९० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेस फक्त १७ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप आणि अकाली दलाला दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाही. पंजाबमध्ये भाजप फक्त ३ जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमधील दिग्गज नेतेही पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखबीरसिंग बादल हे दिग्गज पहिल्या दीडतासाच्या मतमोजणीच्या कलात पिछाडीवर आहेत.

 गोव्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत ४० पैकी २५ जागांचे कल हाती आले असून भाजप १३, काँग्रेस ५, आप १, तृणमूल काँग्रेस२ तर ४ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. गोव्यात माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. मनोहर पर्रीकर हे भाजपच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक होते. मात्र भाजपने उत्पल यांना उमेदवारी न दिल्याने ते अपक्ष मैदानात उतरले होते.

उत्तराखंडची सत्ताही भाजप पुन्हा राखण्याचे चित्र आहे. उत्तराखंडमधील ७० जागांपैकी ४४ जागांवर भाजप, २२ जागांवर काँग्रेस तर २ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

मणीपूरमधील ६० जागांपैकी भाजप २९, काँग्रेस २२ आणि बसप २ जागांवर आघाडीवर आहेत. अन्य दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मिळत असलेल्या या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिल्लीत कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा