उत्तराखंडमध्ये भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल, मात्र निवडणुकीचा चेहरा मुख्यमंत्री धामीच पराभूत!

0
81

डेहराडूनः उत्तराखंडमध्ये भलेही भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि सरकार स्थापण्याच्या तयारीलाही लागलेली असला तरी पक्षाचा निवडणूक चेहरा आणि मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचाच खटीमा विधानसभा मतदारसंघातून सपाटून पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार भुवन कापडी यांनी धामी यांना पराभवाची धूळ चारली.

 मुख्यमंत्रिपदाचा चेहराच या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे भाजपपुढे आता मुख्यमंत्री निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आता भाजप पराभूत झालेल्या धामींनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बहाल करते की अन्य एखाद्या नेत्याची या पदासाठी निवड करते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत हे नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने अतिशय वाईट कामगिरी केली आहे.

भाजपने काही महिन्यांत सासत्याने मुख्यमंत्री बदलले होते, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवणे म्हणावे तितके सोपे जाणार नाही, असे वाटत असतानाच भाजप उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

मतदानाचा शेवटचा टप्पा आटोपल्यानंतर जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत दाखवण्यात आली होती. परंतु उत्तराखंडमध्ये एक्झिट पोलचे अंदाज सपशेल खोटे ठरले. भाजपला उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळताना दिसत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला या राज्यात फक्त ११ जागा मिळाल्या होत्या तर भाजपला ५७ जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसला गटबाजीचा फटकाः प्रदेश काँग्रेसमधील गटबाजीमुळे मोठा फटका बसला आहे, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. उत्तराखंड प्रदेश काँग्रेसमध्ये हरीश रावत यांचा एक गट आहे, तर दुसरा गट पक्षाच्या उर्वरित नेत्यांचा आहे. हरीश रावत यांचा गट मागील एक वर्षापासून त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी करत आला आहे.

परंतु विरोधी पक्षनेते प्रीतमसिंह यांचा गट सामूहिक नेतृत्वातच विधानसभा निवडणुका जिंकण्याची भाषा करत आला आहे. त्यामुळे उत्तराखंडचे काँग्रेस प्रभारी देवेंद्र यादव यांच्यावरही हरीश रावत समर्थकांनी टिकास्त्र सोडले होते. निवडणुकीच्या ऐन तोंडावर हरीश रावत यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केला खरा, पण तरीही हरीश रावत यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले नाही.

भाजपने रोखली अंतर्गत गटबाजीः दुसरीकडे भाजपने सातत्याने मुख्यमंत्री बदलूनही पक्षांतर्गत गटबाजी वाढू दिली नाही. त्यातच केंद्रीय नेतृत्वाचे सातत्याने उत्तराखंडचे दौरे सुरूच होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे तमाम नेते उत्तराखंडचा कानाकोपरा पिंजून काढत होते. कोणत्याही परिस्थितीत उत्तराखंडची सत्ता पुन्हा मिळाली पाहिजे, यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा जोर होता. त्यामुळे भाजपने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवली.

आमदारांच्या सुरक्षिततेची खास व्यवस्थाः निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसनेही आपले आमदार ‘सुरक्षित’ ठेवण्यासाठी राज्यात वरिष्ठ नेते तैनात केले आहेत. भाजपचे निवडणूक रणनितीकार व राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना डेहराडूनमध्ये तळ ठोकून बसवले आहे. काँग्रेसनेही राज्याच्या १३ जिल्ह्यांत १३ पर्यवेक्षक तैनात केले आहेत. या पर्यवेक्षकांमध्ये हरियाणाचे खासदार दीपेंद्र हुड्डा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा