खेला होबेः पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, पण नंदीग्राममध्ये हारल्या!

0
90

नवी दिल्लीः सबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपची दाणादाण उडवत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून २०० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला दोन आकडी जागांवर विजय मिळवताना चांगलीच दमछाक झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार  तृणमूल काँग्रेसने  २१३ तर भाजपने ७५ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात स्वतः ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला आहे.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली. ममतांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांच्या झालेल्या या लढतीत पंधराव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा २७०० मतांनी पुढे होत्या. सोळाव्या फेरीअखेर ममता आणि सुवेंदू यांच्यात केवळ सहा मतांचा फरक उरला होता. दुपारी साडेचार वाजता ममता बॅनर्जींच्या विजयाची बातमी आली. मात्र भाजपने ममतांचा पराभव झाल्याचा दावा केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना १ हजार ६२२ मतांनी पराभूत केल्याचा दावा केला. त्यातच तृणमूलने सायंकाळी सव्वासहा वाजता नंदीग्राममधील मतमोजणी अद्याप सुरू असल्याचे सांगितले. नंतर हाती आलेल्या निकालानुसार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १ हजार ७३६ मतांनी पराभव केल्याचे जाहीर करण्यात आले.

नंदीग्रामच्या मतदारांचा जो काही कौल असेल तो मान्य असेल. परंतु नंदीग्रामध्ये मतमोजणीत गडबड झाल्याची आपल्याकडे माहिती आहे. सत्य समोर आणण्यासाठी आपण कोर्टात जाऊ, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. नंदीग्राममध्ये फेरमतमोजणी करण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.

तामीळनाडूत सत्तांतरः तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप युतीला पायऊतार व्हावे लागले आहे. डीएमके आणि काँग्रेसच्या युतीने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार द्रमुक- काँग्रेस युतीने १४९ जागांवर विजय मिळवला आहे तर ११ जागांवर आघाडी आहे. अण्णाद्रमुक- भाजप युतीने ६७ जागा जिंकल्या आहेत. ७ जागांवर आघाडी आहे.

केरळमध्ये सत्तांतराचा इतिहास बदललाः केरळमध्ये सत्तांतराचा चार दशकांचा इतिहास बाजूला ठेवत तेथील मतदारांनी एलडीएफला दुसऱ्यांदा सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वातील सरकारला केरळच्या मतदरांनी पसंती दिली. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होत आले आहे. परंतु चाळीस वर्षात पहिल्यांदाच एलडीएफला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. केरळमध्ये एलडीएफने ९९ जागा जिंकल्या आहेत. तर यूडीएफने ४१ जागा जिंकल्या आहेत.

आसाममध्ये पुन्हा भाजपः आसाममध्ये मात्र भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. तेथे भाजप व मित्रपक्षांनी ७५ जागा जिकंल्या आहेत तर काँग्रेस आणि मित्रपक्षांनी ५० जागांवर विजय मिळवला आहे. आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री सर्बांनंद सोनोवाल यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

 पुदुचेरीत एआयएनआरसीची सत्ताः पुदुचेरी या ३० सदस्यांची विधानसभा असलेल्या राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एआयएनआरसीने १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेसला केवळ ८ जागा जिंकता आल्या आहेत. इतरांनी ६ जागांवर विजय मिळवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा