विधानसभा अध्यक्षांची आगतिकता: दुचाकीवरून येऊन स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा

0
371

औरंगाबाद/मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षातील रेडिमेड आमदार आणि नेते आपल्या पक्षात सामावून घ्यायला भाजप- शिवसेनेचे नेते किती आगतिक झाले आहेत, याची प्रचिती शुक्रवारी औरंगाबादेत आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना शुक्रवारीच शिवसेनेत प्रवेश करायचा असल्याने ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी खास चार्टर्ड विमानाने औरंगाबादला पोहोचले. ते आल्याचा निरोप मिळताच फुलंब्री मतदारसंघात असलेले बागडे राजीनामा स्वीकारण्यासाठी तातडीने औरंगाबदकडे परत फिरले. कारने परत येत असताना वाटेत रेल्वे फाटक बंद असल्याचे  आणि रेल्वे यायला उशीर असल्याचे समजताच बागडे कारमधून खाली उतरले. त्यांनी रेल्वे रूळ ओलांडला आणि रेल्वे रूळापलीकडे थांबलेल्या दुचाकीवर बसून ते राजीनामा स्वीकारण्यासाठी पोहोचले. विधानसभा अध्यक्षांकडे रेल्वे येण्याची आणि रेल्वे फाटक उघडण्याची वाट पाहण्याइतपतही संयम नव्हता की काय, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

भास्कर जाधव यांना शुक्रवारीच राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश घ्यायचा होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे मुंबईत नसून औरंगाबादला असल्याचे समजल्यानंतर जाधव खास चार्टर्ड विमानाने औरंगाबादला पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत होते. औरंगाबादला पोहोचल्यानंतर बागडे त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात असल्याचे समजले. तसा निरोप बागडे यांना देण्यात आल्यानंतर कुंभेफळ येथे उभयतांची भेट ठरली. कुंभेफळ येथील एका खासगी कार्यालयात भास्कर जाधव आणि शिवसेनेचे अन्य नेते बागडेंची वाट पहात थांबले होते. बागडेही तातडीने माघारी फिरले. परतीच्या प्रवासात रेल्वे फाटक बंद असल्याचे आणि रेल्वे यायला अजून अवकाश असल्याचे समजल्यानंतर वागडे त्यांच्या कारमधून खाली उतरले. त्यांनी पायी रेल्वे रूळ ओलांडला आणि रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या दुचाकीवर बसून ते कुंभेफळमध्ये पोहोचले. विशेष म्हणजे त्यांना घेऊन येणार्‍या दुचाकीस्वाराने हेल्मेटही घातलेले नव्हते. व्हायरल झालेल्या व्हिडीओतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण महाराष्ट्राच्या विधानसभेसारख्या सार्वभौम सभागृहाचे अध्यक्ष आहोत, याचा विसरही बागडे यांना पडला आणि आगतिकतेने ते राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकरण्यास पोहोचले. त्यांनी तो तातडीने स्वीकारताच भास्कर जाधव पुन्हा चार्टर्ड विमानाने मुंबईला पोहोचले. मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा