अतिक मोतीवालांना ब्लॅकमेल करून महिलेने मागितली खंडणी, ११ लाख, फ्लॅटही उकळला!

0
728
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः नामांकित उद्योजकाकडून महिलेसह तिचा भाऊ व साथीदाराने ब्लॅकमेल करत ११ लाख ६० हजारांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर देखील महिला व तिचे साथीदार अत्याचारा खोटा गुन्हा दाखल करुन सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत ५१ लाख रोख, टू बीएचके फर्निश्ड फ्लॅटची मागणी करत आहेत. याविरोधात अतिक मोतीवाला यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सय्यद शाहीन अली कमर अली (सायमन गल्ली, मॉडल स्कुल रोड, धमतरी, रायपुर, छत्तीसगड, ह. मु. थिमपार्क आपार्टमेंट फ्लॅट क्र. ७ जालाननगर, रेल्वे स्टेशन), तिचा भाऊ सय्यद तौसिफ उर्फ सोनू कमर अली व राज अशी तिघांची नावे आहेत.

  जालना रोडवरील मेमन कॉलनीतील रहिवासी उद्योजक मोहम्मद अतिक मोहम्मद सिद्दीक मोतीवाला हे २०१४ मध्ये महागडी कार खरेदी करण्यासाठी प्रोझोन मॉलजवळील सतिश मोटार्समध्ये गेले होते. तेथे व्यवस्थापक असलेल्या सय्यद शाहीन अली हिच्यासोबत मोतीवाला यांची ओळख झाली. त्यावेळी त्यांनी महागड्या कारची बुकिंग केली. ही कार त्यांना सन २०१५ मध्ये मिळाली. त्याचदरम्यान, त्यांची सय्यद शाहीन अली हिच्याशी चांगलीच मैत्री झाली. पुढे याचकाळात सय्यद शाहीनला सतिष मोटार्समधून कामावरुन कमी करण्यात आले. त्यानंतर ती पुणे, सुरत, मुंबई याठिकाणी नोकरीला गेली. तेथून पुन्हा सन २०१७ मध्ये शहरातील ऑडी कारच्या एका शोरुममध्ये नोकरीला लागली. तेथेही पाच ते सहा महिन्यातच तिला नोकरीवरुन काढण्यात आले. बेरोजगार झाल्यामुळे तिने मोतीवाला यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली. ती मोतीवाला यांच्या सासरच्या गावातील असल्यामुळे त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यावेळी तिला मोतीवाला यांच्या व्यवसायाची संपुर्ण माहिती होती. मात्र, नोव्हेंबर २०२०पासून तिच्या स्वभावात बदल होत गेला. त्यामुळे मोतीवाला यांनी तिला टाळण्यास सुरूवात केली. तसेच यापुढे कोणतीही मदत करु शकत नाही, असेही तिला ठणकावून सांगितले. पण काही दिवस शांत बसल्यावर सय्यद शाहीन हिने अचानक २८ नोव्हेंबर २०२०पासून मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली.

बनावट फोटो केले व्हायरलः मोतीवाला यांनी सय्यद शाहीनला टाळण्याचा बराच प्रयत्न केला. त्यामुळे तिने मोतीवाला यांच्यासोबतचे काही बनावट फोटो सोशल मिडीयावर टाकुन बदनामी करण्यास सुरुवात केली. त्या फोटोमध्ये तिने मोतीवाला यांची पत्नी असल्याचेच दर्शवले. हा भयंकर प्रकार मोतीवाला यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी सय्यद शाहीनला जाब विचारला. त्यावर तिने बदनामी नको असेल तर पैसे द्या, असे म्हणत थेट खंडणीची मागणी केली.

घरात घुसून पत्नीलाही मारहाणः ५ डिसेंबर २०२० रोजी मोतीवाला यांच्या घरात बळजबरी शिरुन त्यांच्या पत्नी नफिसा यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्याचवेळी तिने आपले मोतीवाला यांच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचेही सांगितले. याप्रकारानंतर नफिसा यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत सय्यद शाहीनविरुध्द तक्रार दिली.

पुन्हा खंडणीची मागणीः अलीकडच्या काळात सय्यद शाहीन हिने ५१ लाख रुपये रोख, टू बीएचकेचा फर्निश्ड फ्लॅटची मागणी सुरू केली. तसेच मोतीवाला यांच्याशी संबंध असल्याचे बनावट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. यासाठी तिला छत्तीसगडमधील भाऊ सय्यद तौसिफ उर्फ सोनू व राज यांनी मदत केली. दरम्यान, सय्यद शाहीन ही वारंवार मानसिक त्रास देत असल्याने एकदाचे प्रकरण मिटवावे म्हणून मोतीवाला यांनी तीन टप्प्यात तिला ११ लाख रुपये आणि ६० हजारांचा मोबाइल दिला. त्याबाबत तिच्याकडून यापुढे कोणताही त्रास देणार नाही, असे शपथपत्र, तडजोडपत्र व माफिनामा लिहून घेतला. हा प्रकार झाल्यानंतर देखील तिने अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५१ लाख रुपये रोख व टू बीएचके फर्निश्ड फ्लॅट विकत घेऊन देण्याची मागणी सुरूच ठेवली, असे मोतीवाला यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा