शरद पवारांच्या घरावरील हल्ला: वकील गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात, १०७ जणांना अटक

0
529

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणी  १०७ जणांना अटक करण्यात आली असून एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या गावदेवी पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आज शुक्रवारी अचानक सिल्व्हर ओक निवासस्थानी चालून गेले. तेथे आक्रमक कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घराच्या आवारत शिरून घोषणाबाजी करत दगडफेक केली आणि चपला फेकल्या. त्यानंतर काही वेळातच शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. त्या दाखल होताच एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरले. त्या वारंवार कर्मचाऱ्यांना शांत बसण्याची विनंती करत होत्या. एसटी कर्मचाऱ्यांशी शांतपणे बोलण्याची विनंती करत होत्या. तरीही जमाव आक्रमक होता. अखेर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या कड्याच्या माध्यमातून मोकळ्या ठिकाणी येत त्यांनी माध्यमांच्या सहाय्याने एसटी कर्मचार्यांना हात जोडून आवाहन केले.

या सर्वप्रकणी पोलिसांनी १०७ जणांना अटक केली असून त्यात काही महिला आंदोलकांचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना शरद पवार यांच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावणारे कोण आहेत, हे सर्वश्रूत आहे. या घटनेचा लवकर तपास केला जाईल, असेही वळसे पाटील म्हणाले होते.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सायंकाळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. चार ते पाच पोलिस अधिकारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदावर्ते यांच्या परळ येथील निवासस्थानी पोहोचले. तेथून त्यांना ताब्यात घेऊन गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आणण्यात आले आहे. सदावर्ते यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

या हल्लाप्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी वेगळे काही बोलण्याची आवश्यकता नाही. आज येथे जे काही घडले, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होता. याचे उदाहरण या ठिकाणी पाहिले. महाराष्ट्रात राजकारणात मतभेद सतत असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा