औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ नामांतरः राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय

0
184
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा, अशी मागणी भाजप आणि मनसेने लावून धरलेली असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या आज गुरूवारी झालेल्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करून ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात आले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळाचे आभार! महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिलेल्या शब्दांचू पूर्तता करण्यास महाविकास आघाडी सरकार कायम वचनबद्ध आहे, असे ट्विट सुभाष देसाई यांनी केले आहे.

तत्पूर्वी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विधानसभेत निवेदन करून ही माहिती दिली.  विमानतळाचे नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’  असे नाव करण्याबाबतचा ठराव संमत केला आहे. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र सरकारच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा