मनपा पथकाशी धटिंगाई भोवलीः सुरेंद्र कुलकर्णी गजाआड, गुलमंडीवरील ५७ अतिक्रमणे जमीनदोस्त

0
1261

औरंगाबादः औरंगाबादेत कोरोनाचे संकट वाढत असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला  बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णीसह एक व्यापाऱ्याला मंगळवारी पहाटे गजाआड करण्यात आले असून माजी आमदार किशनचंद तनवाणी फरार झाले आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून पथकाला मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही महापालिकेने अद्दल घडवली असून गुलमंडीवरील व्यापाऱ्यांची ५७ अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत.

सोमवारी सायंकाळी महापालिकेचे नागरिक मित्र पथकातील आबाराव साळुंके आणि आत्माराम गवळी यांच्यासह गुलमंडीवर विनामास्क नागरिकांवर कारवाई करत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास  मॅचवेल दुकानासमोर कारवाई करित असतांना तेथे किशनचंद तनवाणी, सुरेंद्र कुलकर्णी आणि व्यापारी आतीश जोजारे आले. त्यांनी पथकाला तुम्ही येथे कारवाई करु नका, तत्काळ निघून जा असे बजावले. त्यावर सुसर यांनी ठीक आहे म्हणत काढता पाय घेतला असता तनवाणी यांनी भोंबेसाहेबांना फोन लावू का, अशी धमकी दिली. त्यावर सुसर यांनी लावा म्हणून सांगितले. त्यनंतर सुरेंद्र कुलकर्णी आणि जोजारे या दोघांनी आमच्या तोंडी लागतो का म्हणत सुसर यांच्यासह साळुंके व गवळी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली.

हेही वाचाः व्हीडिओः औरंगाबादेत कोरोना कारवाईत भाजप नेत्यांच्या खोडा, मनपा पथकाला बेदम मारहाण

या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटे उल्कानगरीचा रहिवासी सुरेंद्र कुलकर्णी आणि दिवाणदेवडीचा रहिवासी व्यापारी आतीश जोजारे या दोघांना अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला एम. मोटे यांनी या दोघांनाही गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे गुन्ह्यातील तीसरा आरोपी माजी आमादार किशनचंद तनवाणी हे पसार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

अतिक्रमणांवर हातोडाः राजकीय नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून महापालिका पथकाला मारहाण करणे गुलमंडीवरील व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले. मंगळवारी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक गुलमंडीवर धडकले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने गुलमंडीवरील व्यापाऱ्यांची ५७ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. चारदोन व्यापाऱ्यांनी केलेल्या अरेरावीमुळे गुलमंडीवरील ५७ व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा