लसीकरणाची सक्तीः तुम्ही लस घेतली नसेल तर होईल जप्ती, दंड आणि सील ठोकण्याची कारवाई

0
310

औरंगाबाद:  ऑटो रीक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री दुकाने, परमीट रूम आणि बार तसेच सर्व प्रकारच्या आस्थापनांचे चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे सक्तीचे करण्याचा आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केला असून लस न घेतलेले चालक, मालक, कामगार आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनांविरुद्ध दंड आणि सील ठोकण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर लस न घेता ऑटो रीक्षा चालवणाऱ्या चालकांवर दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. दिवसभरात अनेक वेगवेगळे प्रवासी ऑटोरीक्षाने प्रवास करतात. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑटोरीक्षा चालकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑटोरीक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा किमान पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल आणि सदर वाहन जप्त करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

ट्रॅव्हल्स एजन्सी यांनी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले असल्याबाबतची काऊंटरवरच खात्री करावी. लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच तिकीट देण्यात यावे. लसीकरण न झालेल्या प्रवाशांना तिकीट देण्यात येऊ नये. तसेच ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक, मालक, कर्मचाऱ्यांचे सुद्धा लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील, या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यवाही पार पाडावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापनेतील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल. कोणत्याही प्रकारच्या आस्थापनांमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास, सदर आस्थापना दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल, या अनुषंगाने कामगार उपायुक्तांना कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

सर्व प्रकारच्या हॉटेल्स, खानावळी येथील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल, याची खात्री करावी.  कोणत्याही प्रकारच्या हॉटेल्स, खानावळीमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास, सदर हॉटेल, खानावळ दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याची कार्यवाही करावी, असे अन्न व औषधी प्रशासनाच्या उपायुक्तांना आदेशित करण्यात आले आहे.

सर्व प्रकारच्या मद्य विक्री आस्थापनांमधील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल. कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्री करणाऱ्या आस्थानांमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास, सदर हॉटेल, खानावळ दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा