जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला ‘जय श्रीराम’, पदवीधर निवडणुकीत येणार रंगत!

0
1174
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले भाजप नेते जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत भाजपच्या प्रदेश कार्य समिती आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते अपक्ष म्हणूनच पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून आपल्याचाच उमेदवारी मिळावी, यासाठी जयसिंगराव गायकवाड यांनी प्रयत्न केले होते. परंतु शेवटपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यत्वाबरोबरच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

हेही वाचाः भाजपचे जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला, सतीश चव्हाणांचा करणार प्रचार!

जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे दोनवेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून ते आता अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. गायकवाड यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, भाजपचे बोराळकर आणि गायकवाड असा तिरंगी सामना रंगणार असून गायकवाडांमुळे चव्हाणांचे मताधिक्य घटणार की बोराळकरांचे नुकसान होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 गायकवाड हे माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री असून बीडचे तीन वेळा खासदारही राहिलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा