मराठवाडा पदवीधर मतमोजणीवर भाजपचा आक्षेप, मतमोजणी मॅनेज केल्याचा आरोप करत कोर्टात धाव

0
171
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकार्‍यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे. अनेक मतपत्रिकांवर एकाच हस्ताक्षरातील पसंतीक्रम, मोजणी करताना २० टक्के मतपत्रिका कोर्‍या होत्या, असे आक्षेप घेत मतमोजणी बूथनुसार न करता संपूर्ण मराठवाड्यातील मतपत्रिका एकत्र करून केल्याने यात मोठा घोळ झाल्याची तक्रार भाजपने केली आहे. याविरोधात न्यायालयात घेण्याची तयारी केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेत तब्बल ५७ हजार ८९५ एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय ठरला. मात्र आता बोराळकर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर एकूणच मतमोजणी प्रक्रियेवरच आक्षेप घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

जवळपास ८० टक्के बूथकेंद्रातील मतदान झालेल्या मतांपेक्षा जास्त मतपत्रिका किंवा कमी भरलेल्या आहेत. सर्वमतपत्रिका एकत्र केल्यानंतर त्यातील २० टक्के मतपत्रिका कोर्‍या होत्या. बूथ अधिकार्‍यांनी सही केलेली व मतपत्रिकांवरील सही अजिबात जुळत नव्हती. ७५ टक्के मतपत्रिकांवर सतीश चव्हाण यांच्यासमोर पहिल्या क्रमांकाचा पसंतीक्रम एकाच हस्ताक्षरातील आहे. चव्हाण यांचा पसंतीक्रम असलेल्या मतपत्रिका सलग येत होत्या, असे आक्षेप त्यांनी नोंदवले आहेत. यावर निवडणूक अधिकार्‍यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे बोराळकर यांनी सांगितले.

  अपक्ष उमेदवारांनीही घेतला आक्षेपः बड्या राजकीय लोकांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. आपल्यासह इतर ५ ते ६ अपक्ष उमेदवारांनी मतमोजणीवर शंका व्यक्‍त केली आहे. त्यासंदर्भात निवडणूक अधिकार्‍यांकडे आक्षेप घेतला आहे. यामुळे सर्वांच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे, असे बोराळकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा