औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले असून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे सुमारे १ लाख ८ हजार मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणेच बाकी आहे.
या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५६ हजार १८४ मते मिळाली. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सतीश चव्हाण यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल,असे सूत्रांनी सांगितले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र होते. परंतु चौथ्या फेरी अखेरच महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाचा टप्पा गाठला. त्यांच्या नजीकचे प्रतिस्पर्धी शिरीष बोराळकर त्यांची स्पर्धा करताना चांगलीच दमछाक झाली. त्यांना चव्हाणांच्या सुमारे अर्धीच मते मिळाली.