पदवीधर निवडणूकः सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता

0
1483
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला असून सध्या वैध- अवैध मतांची छाननी सुरु आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी पहिल्या पसंतीक्रमांची मते मोजण्यास सुरुवात होणार असून पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्यासाठी सायंकाळचे ६  वाजण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ६४. ४९ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. २ लाख ४० हजार ७९६ मतपत्रिकांची छाननी करून वैध- अवैध मते बाजूला करण्याचे काम सुरु आहे. मतपत्रिकांची संख्या जास्त असल्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे. ही छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांसाठी विजयाचा कोटा निश्चित करण्यात येईल. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यासाठी दोन हॉलमध्ये प्रत्येकी २८ टेबल म्हणजेच एकूण ५६ टेबल लावण्यात आले आहेत. ५६ मतमोजणी पर्यवेक्षकांसह एकूण ५०७ अधिकारी- कर्मचारी मतमोजणी करत आहेत. २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे बांधून फेरीनिहाय मतमोजणी केली जाणार असल्याने पहिल्या फेरीचा निकाल हाती यायला सायंकाळचे किमान ६ वाजतील, असा अंदाज आहे.

 एका फेरीमध्ये ५६ हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. दुपारी दोन वाजेनंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ केला जाणार असून त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्यासाठी सायंकाळचे सहा वाजण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः ‘पदवीधर, शिक्षक’ निवडणुकीचे निकाल सांगणार ठाकरे सरकारची लोकप्रियता, भाजपची पत!

उत्सुकता शिगेलाः पदवीधरची ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढली गेली. या मतदारसंघातून सलग दोनवेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मतविभाजन घडवून आणण्यात आले आहे. त्यामुळे विजयासाठीचा कोटा निश्चित झाल्यानंतर पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांवर हा कोटा जर पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. दुसऱ्या पसंतीची मते मोजली तर मात्र निकाल धक्कादायक लागू शकतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. त्यामुळेच या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा