पदवीधर निवडणूकः मतदारांना विशेष नैमित्तिक रजा, मतदान केंद्र परिसरात मोबाइलवर बंदी

0
54
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः  उद्या मंगळवारी होत असलेल्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून  विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कळवले आहे. दरम्यान, मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मंगळवार, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असेही ते म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाच्या २ नोव्हेंबर रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

खासगी आस्थापनांना सूचनाः जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असेही चव्हाण यांनी कळवले आहे.

मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागूः औरंगाबाद जिल्ह्यात या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्‍यात आले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या ठिकाणी २०० मीटर परिसरातील सर्व पक्ष/ कार्यालय उमेदवाराचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात फेरीवाल्यांनाही बंदी राहील. निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनांनाही मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील, असे प्रशासनाने कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा