कुणी पदावर बसला म्हणून त्याची मर्जी चालत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा!

0
166
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यावर अमृतमंथन झाले पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या अधिकारांचा आढावा घेतला पाहिजे. केंद्राप्रमाणेच राज्यही सार्वभौम असेल तर ते अधिकार आपण वापरत आहोत का? कुणी पदावर बसला म्हणजे त्याची मर्जी चालणार नाही. मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आज, शनिवारी भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी न्या. डी. वाय. चंद्रचूड, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चला उद्योजक बनाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही निशाणा साधला. न्यायदानाची प्रक्रिया गतीमान होण्याची गरज आहे. एक आरोपी १९५८ पासून फरार असल्याचे आताच ऐकले. आमच्या राज्यात एक तक्रारदारच गायब आहे. पण खटला सुरू आहे. तक्रार केली, आरोप केले आणि पळून गेला. कुठे गेला माहीत नाही. पण आरोप केल्यानंतर खणले जात आहे. चौकश्या, धाडसत्रे सुरू आहेत. ही जी काही पद्धत आहे, तिला चौकट आणण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

न्यायदानाची जबाबदारी ही केवळ न्यायालयाची नाही. हे टीमवर्क आहे. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. कार्यकारी यंत्रणा, कायदे मंडळ आणि प्रसार माध्यमे यांना लोकशाही पेलण्याचे कर्तव्य करायचे आहे. यांच्यावर लोकशाही आणि सामान्य लोकांचा प्रभाव आहे. आम्हाला न्याय पाहिजे असेल तर आम्हाला तो तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपले लोकशाहीचे स्तंभ कमकुवत झाल्याचे मला वाटत नाही. कोणत्याही दबावाने ते कोलमडून पडणार नाही. एकही स्तंभ कोणत्याही दबावाने कोलमडेल असे वाटत नाही. यातील एक जरी स्तंभ कोसळला तर अख्खे लोकशाहीचे छप्पर कोसळून पडेल. मग जे काही होईल ते कितीही खांब लावले तरी पुन्हा उभे करता येईल असे मला वाटत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एका अप्रतिम न्यायमंदिराचे आज लोकार्पण होत आहे. भूमीपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. या शहरातील विधिज्ञ, कायदाप्रेमी या इमारतीशी संबंधित आहेत. त्यांना या खंडपीठाचा इतिहास माहीत आहे. ही इमारत पाहण्यासाठीसुद्धा लोक आले पाहिजेत. त्यांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा