‘लस नाही तर पेट्रोल नाही’, औरंगाबादेतील पेट्रोलपंपांवर नागरिकांची कोंडी!

0
214

औरंगाबादः कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची सक्ती करता येणार नाही. सक्ती करणे कायद्याला धरून होणार नाही परंतु देश हितासाठी नागरिकांनी लस घेतली पाहिजे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेले असले तरी औरंगाबादचे जिल्हा प्रशासन लसीकरणाच्या सक्तीवर ठाम आहे. औरंगाबाद शहरात लस नाही तर पेट्रोल नाही, असा पॅटर्न सर्वच पेट्रोलपंपावर राबवला जात असून त्यामुळे नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

औरंगाबादेतील कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यानंतर नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. काही दिवसांपूर्वी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर रांगेत दिसणारे औरंगाबादकर आता लस घ्यायला टाळाटाळ करताना दिसत आहेत. घटलेले हे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीकरणाबाबत नवीन नियमावली नुकतीच जारी केली आहे.

या नियमावलीनुसार शासकीय निमशासकीय, खासगी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. लस घेतलेली असेल तरच डिसेंबर महिन्याचे वेतन मिळेल, प्रवासाची मुभा असेल, पर्यटनस्थळी प्रवेश, स्वस्त धान्य दुकानावर धान्य आणि पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेल मिळेल, अन्यथा या सुविधांपैकी कोणतीही सुविधा मिळणार नाही, अशी तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

लसीकरणाचा हा औरंगाबाद पॅटर्न चर्चेत आला तो जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड नियमावलीचे पालन केले नाही म्हणून बाबा पेट्रोल पंपाला सील ठोकल्यावर. लस घेतलेली नसलेल्या नागरिकांनाही पेट्रोल-डिझेलची विक्री केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाबा पेट्रोलपंपाला सील ठोकले. त्यानंतर पेट्रोलपंप मालकाने नियमावलीचे पालन करतो, असे सांगितल्यावर ते सील उघडण्यातही आले.

बाबा पेट्रोलपंपावरील या कारवाईमुळे औरंगाबादेतील पेट्रोलपंपचालक आजपासून जिल्हा प्रशासनाच्या या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करू लागले आहेत. प्रत्येक पेट्रोलपंपावर एक खास व्यक्ती लस घेतल्याचा मेसेज किंवा प्रमाणपत्र असेल तरच पेट्रोलपंपावर पेट्रोल घेण्यासाठी एन्ट्री देऊ लागला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे गरज पडली की पेट्रोलपंपाची वाट धरणाऱ्या नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

 अनेक दुचाकीस्वार पैसे मिळतील तसे गरजेनुसार पेट्रोल भरतात आणि पुढील कामाला निघून जातात. अनेक नागरिकांकडे एकदाच एक लिटर पेट्रोल भरण्याएवढेही पैसे नसतात. असे नागरिक आज पेट्रोलपंपावर आले तेव्हा अनेकांना अडवण्यात आले आणि लस घेतल्याचा मेसेज किंवा प्रमाणपत्र नसेल तर त्यांना पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.

काय म्हणाले होते आरोग्यमंत्री?: लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. देश हितासाठी लस घेणे गरजेचे आहे. मात्र लसीकरण हा सर्वस्वी ऐच्छिक विषय असून त्याबाबत जबरदस्ती करता येणार नाही. लसीकरणाची सक्ती करणे कायद्याला धरून होणार नाही. जे कायद्यात बसत नाही ते अनिवार्य करावे का हा प्रश्न आहे. कुठलीही सक्ती न करता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घ्यावी. लोकांना समजावून सांगून लस घ्यायला लावू,’ असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या औरंगाबाद पॅटर्नवर मागच्याच आठवड्यात सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा