मोदींकडून मराठवाडा आणि मराठवाड्यातील उद्योगाच्या हातावर तुरी

0
276

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेय लाटण्यासाठी शेंद्रा-बीडकीन डीएमआयसीतील ऑरिक सिटी हॉलचे उदघाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र मोदींनी त्यांच्या भाषणात मराठवाडा किंवा मराठवाड्यातील उद्योगांसाठी कोणतीच मोठी घोषणा केली नसल्यामुळे उद्योगजगतासह मराठवाडी जनताही नाराजी व्यक्त करत आहे.

शनिवारी मोदींच्या हस्ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ऑरिक हॉल, कमांड कंट्रोल सेंटर, रोड सिस्टिम नेटवर्क, लॅण्ड सिस्टम आणि अ‍ॅमेनिटीजचे लोकार्पण करण्यात आले.2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी मोदी औरंगाबादेत आले होते. त्यानंतर पहिल्यांच ते शासकीय कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. त्यामुळे  मराठवाड्यातील पर्यटन, विमान कनेक्टिव्हीटी, उद्योगांचे सक्षमीकरण याबाबींशी संबंधित मोठ्या घोषणा मोदींकडून केल्या जाण्याची येथील उद्योग जगताची अपेक्षा होती.  ऑरिक सिटीचे देश-विदेशात ब्रँडिंग करण्यात आले, त्या पार्श्‍वभूमीवर मोदी ऑरिक सिटीमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करतील, असे उद्योगजगताला वाटत होते. मराठवाड्यातील, विशेषतः औरंगाबादेतील उद्योगाला मरगळ आली असून ती झटकून टाकण्यासाठी मोदी बुस्टर डोस देतील, असेही वाटत होते. मात्र ती फोल ठरली. गेली काही वर्षे कायम दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी काही तरी भरीव देऊन जातील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.

ऑरिक सिटीच्या कंट्रोल रुमच्या लोकार्पणाचा आजचा दिवस मराठवाड्यासाठी क्रांतिकारी आहे. ऑरिक सिटीमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योग येत आहेत. यात मोठी गुंतवणूक होत असून यातून मराठवाड्यात रोजगार उपलब्ध होत आहे, असे मोदी म्हणाले. परंतु येथे कोणत्या कंपन्या, किती गुंतवणूक करणार याबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सभेत ज्या मराठवाडा वॉटर ग्रीडचा वारंवार उल्लेख करतात, त्याचाच उल्लेख मोदींनीही आपल्या भाषणात केला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारी कौतुकास्पद योजना आहे. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, असे मोदी म्हणाले. बचत गटांच्या महिलांना एक लाखांचे कर्ज देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी महिला बचतगट सक्षमीकरण मेळाव्यात केली खरी, पण त्यांच्या भाषणात मराठवाडा केंद्रीत एकही घोषणा झाली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा