औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढणार, औट्रम घाटात होणार ७ किमीचा बोगदा

0
383

नवी दिल्लीः औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे औरंगाबाद शहरासाठी मंजूर असलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सात किलोमीटरचा बोगदाही प्रस्तावित आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामावर चर्चा करण्यासाठी आज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी दोहोंमध्ये विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यांतील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्याची गरज असून त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निधी मंजूर करून तत्काळ बोगद्याचे काम मार्गी लावण्याची मागणी देसाई यांनी यावेळी केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिर्डी-औरंगाबाद दरम्यान दुहेरी महामार्गाचे काम हाती घेतले असून त्यासाठी विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली.

डीएमआयसी अंतर्गत असलेल्या ऑरिक सीटीच्या विकासासाठी शेंद्रा ते बिडकीन दरम्यान चारपदरी महामार्ग तातडीने पूर्ण करण्यात यावा. तसेच औरंगाबाद ते पैठण दरम्यान चार पदरी महामार्गाचा प्रश्न  मार्गी लावण्याची मागणी देसाई यांनी केली.

औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेला आहे. याच मार्गालगत औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १,६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

देसाई यांच्या या मागणीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. दरम्यान, यामुळे औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना गती मिळणार असल्याचा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा