व्हिडीओः उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे भयंकर संकटः अनेक जण बेपत्ता; प्रचंड नुकसान

0
720

डेहराडूनः उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील रैनी येथील जोशी मठाजवळ आज सकाळी हिमकडा कोसळली असून या भयंकर घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानीची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक आलेला पूर आणि प्रचंड पावसामुळे ऋषिगंगा वीज निर्मिती प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. धरणातील पाणी सोडून देण्यात आल्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे नदीकाठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसून अनेक जण बेपत्ता झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

चमोली जिल्ह्यातील रैणीमधील जोशी मठ ते मलारीपासून २० किलोमीटर अंतरावर ही हिमकडा तुटून कोसळली आहे. हिमस्खलन होऊन ही हिमकडा कोसळ्यानंतर प्रचंड पाऊस आणि अचानक जलप्रवाह वाढल्यामुळे धौलीगंगा नदीवर असलेल्या ऋषिगंगा वीज निर्मिती प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. धौलीगंगा नदीकाठच्या अनेक घरांना या पुराचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पुरात अनेकजण बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अलकनंदा नदीच्या खालच्या क्षेत्रातही पुराचा धोका आहे. नदीकाठच्या लोकांना युद्धपातळीवर स्थलांतरित करण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी म्हटले आहे.

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह रोखण्यात आला आहे. अलकनंदा नदीचा पुर रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरणातील पाणी सोडून देण्यात आले आहे. एसडीआरएफलाही अलर्ट देण्यात आला असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रावत यांनी केले आहे. रावत हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

व्हिडीओ सौजन्य/twitter/@Supriya23bh

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा