अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, देशभरात हायअलर्ट जारी

0
107

नवी दिल्लीः संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या वादग्रस्त राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी सकाळी ऐतिहासिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यासाठी देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणिन्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचे पाच सदस्यीय घटनापीठ शनिवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर करायला सुरूवात करतील, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 16 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे 6 ऑगस्टपासून सलग 40 दिवस सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वादग्रस्त रामजन्म भूमी- बाबरी मशिदीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद 106 वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्टकचेर्‍या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्ट या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा