बौद्धस्थळ अयोध्या ट्रेंडिंगः अयोध्येतील प्राचीन अवशेष सम्राट अशोक काळातील असल्याचा दावा

1
2091
साम्यः पहिले छायाचित्र कोलकात्याच्या इंडियन म्युझियममधील भरहुत येथे सापडलेले धम्मचक्र. दुसरे छायाचित्र अयोध्येत सापडलेल्या अवशेषाचे.

अयोध्याः अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राची मूर्ती व अवशेषांवरून वाद निर्माण झाला आहे. सापडलेल्या मूर्त्यांवरून मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर बौद्धस्थळ अयोध्या ट्रेंड होत आहे. सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील असल्याचा दावा काही लोक करू लागले आहेत. काही लोकांनी तर रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्कोकडे केली आहे.

अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर सपाटीकरण करताना सापडलेले प्राचीन अवशेष शिवलिंग नसून बौद्ध स्तंभ आहे, असा दावा करत काही ट्विटर यूजर्सनी बौद्ध धम्मातील कलाकृती आणि सपाटीकरणात सापडलेल्या प्राचीन अवशेषांची छायाचित्रे शेअर करत तुलनाही करत आहेत. अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनी केला आहे.

 अयोध्येतील विनीत कुमार मौर्य यांनी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून वादग्रस्त स्थळाखाली अनेक अवशेष गाडले गेलेले आहेत, ते सम्राट अशोक काळातील आहेत आणि त्याचा संबंध बौद्ध धम्माशी आहे. बाबरी मशिदीच्या बांधकामाच्या आधी वादग्रस्त जागेवर बौद्ध विहार होते, असा दावा अयोध्येतील विनीत कुमार मौर्य यांनी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केला होता. भारतीय पुरातत्व खात्याने केकेल्या उत्खननात रामजन्मभूमीच्या ठिकाणी स्तूप, गोलाकार घुमट, भींती आणि खांब आढळून आले आहेत. बुद्ध विहाराची ती वैशिष्ट्ये असतात. ज्या ५० खड्ड्यांत उत्खनन करण्यात आले तेथे कोणत्याही मंदिर किंवा हिंदू बांधकामाचे अवशेष आढळले नाहीत, असा दावाही मौर्य यांनी या याचिकेत केला होता.

अयोध्या नव्हे साकेत नगरीः अयोध्येतील अवशेषांवरून आता वेगवेगळे दावेही केले जात आहेत. आजची अयोध्याही  बौद्धांची प्राचीन साकेत नगरी आहे. गुप्त काळात साकेत नगरीचे नाव बदलून अयोध्या ठेवण्यात आले. त्यापूर्वी भारतात कुठेही अयोध्या नव्हती, असा दावा ज्येष्ठ विचारवंत दिलीप मंडल यांनी केला आहे.


पहिले छायाचित्र बौद्ध धम्मातील मनौती स्तुपाचे. दुसऱ्या छायाचित्रात अयोध्येत सापडलेले अष्टकोनी शिल्पांकन.

 अयोध्येतील अवशेषांबाबत दावे असेः
१. अयोध्येत सापडलेले चक्र आणि बौद्ध स्तुपांवरील धम्मचक्र याच्यात अद्भूत साम्य आहे.
२. कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये असलेले भरहुतमध्ये सापडलेले धम्मचक्र आणि अयोध्येत सपाटीकरणात सापडलेले धम्मचक्र सारखेच आहे.
३. २९ आरे असलेले धम्मचक्र बौद्ध धम्माशिवाय अन्य कोणत्याही धार्मिकस्थळावर आढळून येत नाही. अयोध्येत सापडलेले धम्मचक्र २९ आरे असलेलेच आहे.
४. अयोध्या मंदिर परिसरात सपाटीकरणात जे शिल्पांकन सापडले आहे, त्याला बौद्ध धम्मात पद्म- पदक म्हणतात.
५. अयोध्येत सापडलेल्या ज्या अष्टकोनी कलाकृतीला शिवलिंग असल्याचे सांगण्यात येत आहे, वस्तुतः ते मनौती स्तूप आहे.
६. अयोध्येच्या चारही बाजूला बौद्धस्थळे आहेत. श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशीनगर, कौशांबी, सनकिसा आणि सारनाथ. चीनी प्रवाशी फाइयानलाही अयोध्येत शंभरहून अधिक बौद्ध विहार आढळले होते. आता खोदकामात त्याचेच अवशेष सापडत आहेत.

सपाटीकरणात सापडलेले अवशेष मंदिराचे अवशेष आणि तुटलेल्या मूर्त्या असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टने केला आहे तर या मूर्त्या मंदिराचे अवशेष नसल्याचे मुस्लिम पक्षकारांचे म्हणणे आहे. १३ व्या शतकात तेथे कोणतेही मंदिर होते हे भारतीय पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मूर्त्या आणि मंदिराचे अवशेष सापडले एक प्रपोगंडा आहे, असे अयोध्या वादात सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा