‘जुन्याच जखमा बसतो कोरत, नंतर नंतर…’ बी.रघुनाथ काव्यसंध्येत युवा कवींची धमाल!

0
80

औरंगाबाद:  आपल्या रचनांमधून प्रेम, विरह, मैत्री, विद्रोह, कोलाहल असे मानवी भावभावनांचे विविध पदर उलगडत महाराष्ट्रातील युवा कवींनी बी. रघुनाथ काव्यसंध्येत दाद मिळवली. युवा कवींच्या नाविण्यपूर्ण कविता, गीत, गझलांनी या काव्यमैफिलाला रंग चढला.

मराठवाड्याचे भूषण व ज्येष्ठ कवी दिवंगत बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई -विभागीय केंद्र औरंगाबाद, नाथ ग्रुप व परिवर्तन यांच्या वतीने बी.रघुनाथ युवा काव्यसंध्येचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. कोविड निर्बंधांमुळे ही काव्य मैफल ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.

 चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

रसिकांनी या काव्यमैफलाला चांगला प्रतिसाद दिला. नाथ ग्रुपचे अध्यक्ष व बी. रघुनाथ काव्यसंध्येचे आयोजक नंदकिशोर कागलीवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी त्यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली.

काव्यसंध्येची सुरूवात औरंगाबाद येथील कवी अपूर्व राजपूत यांच्या ‘जुन्याच जखमा बसतो कोरत, नंतर नंतर’ या गझलेने झाली. त्यांनी सादर केलेल्या ‘लब गुलाबी एक तरफ है’ या मिली-जुली गझल प्रकाराला रसिकांची दाद मिळाली. नांदेड येथील सुहासिनी देशमुख यांनी ‘मलाही करायचाय विद्रोह’ या कवितेच्या माध्यमातून समाजातील विकृत मानसिकेतवर भाष्य केले. सामाजिक विषमता दर्शवणारी ‘भूख’ ही हिंदी कविता त्यांनी सादर केली. बीडचे संतोष गायकवाड यांनी ‘हे बघं असंय ही’ कालचं आणि आजचं प्रेम यातील अंतर दर्शवणारी आणि लॉकडाऊनकाळात सर्वांच्याच मनाची व्यथा सांगणारी ‘आणि पुन्हा एकदा’ ही कविता सादर केली. मुंबईच्या भैरवी चितळे यांनी ‘आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी’ ही गझल आणि ‘याद तुझी मग’ ही काव्यरचना सादर केली. सोलापूर येथील कवी नितीन जाधव यांनी ‘भाकर’ आणि स्त्री पुरूष समानतेवर भाष्य करणारी ‘बाईमाणूस’ या काव्यरचना सादर केल्या.

अकोला येथील कवी अनंत राऊत यांनी ‘आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे’ ही कविता सादर केली. सध्या ऑनलाइन गाजत असलेली मैत्रीवर आधारित असलेली ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ ही कविता सादर केली. औरंगाबाद येथील कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांनी स्त्रियांच्या व्यथा मांडणारी ‘मासिक पाळी’ ही कविता सादर केली. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी ‘चल दंगल समजून घेऊ’ या कवितेने सर्वांची दाद मिळवली.

डॉ.स्वप्निल चौधरी यांनी या काव्यसंध्येचे निवेदन केले. श्रीकांत देशपांडे यांनी आभार मानले.विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, नाथ ग्रुपचे शिव फाळके, सुबोध जाधव, गणेश घुले, निखिल भालेराव, मंगेश निरंतर, दीपक जाधव, मयूर देशपांडे यांनी कविसंमेलनाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा