बाबा रामदेव यांनी डॉक्टरांबाबतचे वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले, पण थोपटून घेतली स्वतःचीच पाठ!

0
254
संग्रहित छायाचित्र

डेहराडूनः इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) घेतलेला आक्रमक पवित्रा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्र लिहून केलेली कानउघाडणी यामुळे योगगुरू बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथी आणि डॉक्टराबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य अखेर मागे घेतले आहे. आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असेही रामदेव यांनी म्हटले आहे. कोरोना काळात ऍलोपॅथी डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आहेत, त्याचा आम्ही सन्मान करतो. आम्हीही आयुर्वेद आणि योगाच्या प्रयोगाने कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले, त्याचाही सन्मान झाला पाहिजे, असे रामदेव यांनी या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे बाबा रामदेव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे पत्र शेअर करताना चिकित्सा पद्धतीतील वादाला पूर्णविराम देण्यासाठी मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे म्हटले आहे. मात्र या पत्रात वक्तव्य मागे घेत असल्याचा कुठेही उल्लेख नाही. हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात रामदेव यांनी फक्त खेद व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमागे ऍलोपॅथी कारण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य रामदेव यांनी सार्वजनिकरित्या केले होते. रुग्णांवर ऍलोपॅथी औषधांचा मारा केल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही रामदेव यांनी केला होता. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील डॉक्टर संतप्त झाले होते. डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेव यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून रामदेवांवर कारवाईची मागणीही केली होती.

आयएमएच्या आक्रमक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना पत्र लिहून हे वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योध्यांचा अपमान केल्याने खूप दुःख झाले आहे. आपण दिलेल्या स्पष्टीकरणामुळे वेदना शमणार नाहीत, असे हर्षवर्धन यांनी या पत्रात नमूद करत वादग्रस्त वक्तव्य मागे घ्या, असे रामदेव यांना सांगितले होते. त्यानंतर रामदेव यांनी वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

रामदेव यांनी डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून आपण वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले असल्याचे कळवले आहे. या पत्रात ते म्हणतात की, आम्ही आधुनिक आरोग्य विज्ञान किंवा ऍलोपॅथीच्या विरोधात नाही. जीवन रक्षा प्रणाली आणि शल्य चिकित्सा विज्ञानात ऍलोपॅथीने खूप प्रगती केली आहे आणि मानवतेची सेवा केली आहे. माझे जे वक्तव्य कोट करण्यात आले आहे, ते कार्यकर्त्यांच्या एका बैठकीतील आहे. या बैठकीत व्हॉट्सअपवर आलेला मेसेज वाचून दाखवला होता. त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे.

उपदेशाचे डोसः कोणत्याही चिकित्सा पद्धतीतील त्रुटी अधोरेखित करणे हा त्या पद्धतीवरील हल्ला समजण्यात येऊ नये, हा विज्ञानाचा विरोध तर अजिबात नाही. सर्वांनीच आत्मपरीक्षण करून निरंतर प्रगतीशील राहिले पाहिजे, असेही रामदेव यांनी या पत्रात म्हटले आहे.

 आयुर्वेद आणि योगाचा अनादर करू नकाः काही ऍलोपॅथीचे डॉक्टर्स भारतीय चिकित्सा विज्ञान, आयुर्वेद आणि योगाला मिथ्या विज्ञान इत्यादी संबोधून अनादर करतात. त्यांनीही असा अनादर करू नये. कारण त्यामुळेही कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावतात, असेही रामदेव या पत्रात म्हणतात. कोरोना काळात ऍलोपॅथी डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आहेत, त्याचा आम्ही सन्मान करतो. आम्हीही आयुर्वेद आणि योगाच्या प्रयोगाने कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आहेत, त्याचाही सन्मान झाला पाहिजे, असेही रामदेव या पत्रात म्हटले आहे.

 असे केले स्वतःचेच मार्केटिंगः आधुनिक चिकित्सा विज्ञानाने चेचक, पोलिओ आणि टीबीसारख्या गंभीर रोगांवर उपचार शोधला आहे, तर योग, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी आदी भारतीय चिकित्सा पद्धतींनी रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, अर्थरायटीस, फॅटी लिव्हर, हेपिटायटीस, अस्थमा यासारख्या जटील आणि वंशपरंपरागत रोगांचे नियंत्रण आणि कायमस्वरुपी उपचार दिले आहेत, अशी बढाई मारत बाबा रामदेव यांनी या पत्रात स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. हर्षवर्धन यांना लिहिलेल्या १७ ओळींच्या पत्रात ‘माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे,’ एवढी एक ओळ सोडली तर रामदेव यांनी ऍलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेद आणि योग श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यासाठीच उर्वरित मजकूर लिहिला आहे.

बाबा रामदेव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले हेच ते पत्र.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा