मामा- भाच्यातील वाद चव्हाट्यावरः भाजप आमदार नारायण कुचेंचा भाचा जालन्यातून दोन वर्षे तडीपार

0
1608
संग्रहित छायाचित्र.

जालनाः जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला असून आ. कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्याविरुद्ध जालना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे.

दीपक डोंगरे हा विविध गुन्ह्यातील आरोपी असून त्यामुळे त्याला जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमागे मामाचा म्हणजेच आमदार नारायण कुचे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप दीपकने केला आहे.

जालना पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्यानंतर दीपक डोंगरेने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आमदार कुचे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आमदार नारायण कुचे यांनी स्वतः त्यांच्या मुलीला हाताशी धरून तीन गुन्हे दाखल केले. माझ्यावरएकदा हल्ला केला. बाई लावून फसवण्याचा प्रयत्न केला. ग्राम पंचायत निवडणूक जाहीर होताच मला तडीपार करून टाकले. माझे पोलिस स्टेशन आहे चंदजिरा आणि माझा प्रस्ताव बनवला बदनापूर पोलिस स्टेशनने असेही दीपक डोंगरेने म्हटले आहे.

मी उद्याचा राजकारणी म्हणून उदयास येईल, याची आमदार नारायण कुचे यांना भीती वाटते. त्यामुळेच त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून मला दूर ठेवले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची परवानगी मागितली, मात्र तीही दिली जात नाही, असा आरोपही दीपक डोंगरेने केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल आणि दूध का दूध पानी का पानी होईल, असा विश्वासही दीपक डोंगरेने व्यक्त केला आहे.

 दीपक डोंगरे हा विविध गुन्ह्यातील आरोपी आहे. जालना जिल्हा पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यावरून दीपक डोंगरेवर १५ डिसेंबर रोजी तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीचा आदेश लागू झाल्यापासून दोन वर्षे दीपक डोंगरेला जालना जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा