किर्तनात ‘तमाशा’ची झिंग भोवलीः बंडातात्या कराडकरांना सातारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

0
583
संग्रहित छायाचित्र.

साताराः सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्यातील महिला नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे किर्तनकार प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन आणि महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दारू पितात. राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पिऊन रस्त्यावर पडतात. कुणी आव्हान दिलेच तर ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याची आमची तयारी आहे, असे बंडातात्या म्हणाले होते.

या आंदोलनादरम्यान साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचाः बंडातात्या आधी बरळलेः सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात; नंतर मागितली माफी!

बंडातात्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले आणि त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर त्यांनी सपशेल माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र सातारा पोलिसांनी त्यांना विनापरवाना गर्दी जमवून आंदोलन करणे आणि महिला नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक विधाने केल्याबद्दल आज सकाळी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांना फलटण तालुक्यातील पिपरंद येथील राष्ट्रसंत गुरूवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले होते. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या अटकेची प्रक्रिया करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 बंडातात्याच्या अटकेच्या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा शहर पोलिस ठाणे परिसर आणि बंडातात्यांच्या आश्रमाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिला नेत्यांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडातात्या कराडकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. तसेच राज्यभर आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

नेमके काय म्हणाले बंडातात्या? पहा व्हिडीओ…:  पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते विचारा? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारू पितात. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पित नाही, त्याचे नाव सांगा. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. आपण ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांनी पुरावा मागितला तर ते सिद्ध करू शकतो. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटे बोलत आहेत हे सांगावे, असे आव्हानही बंडातात्यांनी दिले.

बंडातात्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखलः दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बीडमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या पेठ बीड पोलिस ठाण्यात बंडातात्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत बंडातात्याविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा