किर्तनात ‘तमाशा’: बंडातात्या सातारा पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त वक्तव्याची ‘झिंग’ अंगलट

0
686
Photo: A still from video

साताराः सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना राज्यातील महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सपशेल माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारू पिण्याबाबत महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे नको ते किर्तन करून महिला नेत्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची झिंग बंडातात्याच्या चांगलीच अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कराडकर यांनी  राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पिऊन रस्त्यावर पडतात आणि आमचे आव्हान कुणी स्वीकारले तर ते सिद्धही करू, असे म्हटले होते. त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे थेट नाव घेत त्याही दारू पितात असे म्हटले होते.

नेमके काय म्हणाले होते किर्तनकार बंडातात्या कराडकर? पहा व्हिडीओ…

 बंडातात्या यांच्या वक्तव्यावरून राज्यभर तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाने बंडातात्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करून तातडीने अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बंडातात्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचा आणि राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचाः व्हिडीओः बंडातात्या आधी बरळलेः सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात; नंतर मागितली माफी!

बंडातात्याच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारीच पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. पोलिसांनी बंडातात्याच्या दोन्ही मठावर मोठा बंदोबस्तही तैनात केला केला. आज, शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांच्या कारवाईची चक्रे फिरण्यास सुरूवात झाली आणि बंडातात्या यांना फलटण करडी येथील त्यांच्या मठातून ताब्यात घेतले. सातारा ग्रामीण पोलिस ठाण्यातून त्यांना साताऱ्यात नेले जाणार आहे. विनापरवानगी जमाव जमवणे आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी बंडातात्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकऱणी तक्रार आल्यास त्याहीबाबत गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखवली आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चोहोबाजूंनी टिकेची झोड उठल्यानंतर बंडातात्यांनी सपशेल माफीही मागितली होती. ज्या ज्या व्यक्तींची मी नावे घेतली, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा आकस नाही. मी काही त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने कुणावरही आरोप किंवा टिप्पणी केली नाही. अनवधानाने हे वक्तव्य केले गेले. त्याबद्दल मी माफी मागत आहे. पत्रकारांनी हा विषय आता जास्ता वाढवू नये, असे सांगत बंडातात्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा