बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामरावबापू महाराज यांचे निधन, देशभरातील समाजावर शोककळा

0
257
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि संत सेवालाल महाराज यांचे वंशज रामरावबापू महाराज यांचे काल रात्री उशीरा लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.

संत रामरावबापू महाराज हे वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते. त्यांचा जन्म ७ जुलै १९३५ रोजी पोहरादेवी येथे झाला होता. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे १७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 संत परशराम महाराज शिवलीन झाल्यानंतर रामरावबापू महाराज यांना वयाच्या १४ व्या वर्षी, १९४८ मध्ये संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर बसवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळाचे सेवन करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दूध घेतानाही त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते.

१२ वर्षे अनुष्ठान आणि १२ वर्षे मौन धारण केल्यानंतर संत रामरावबापू महाराज यांनी देश भ्रमंतीला प्रारंभ केला होता. संत रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रद्धा असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 पोहरादेवी हे संस्थान बंजारा समाजाची काशी मानली जाते. येथे राजकीय नेत्यांचाही चांगलाच राबता असतो. संत रामरावबापू महाराज यांच्या निधनामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. संत रामरावबापू यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा