बँक डेटा चोरीः शर्मा, संधूच्या संपर्कातील ‘बडा मासा’ शोधण्यासाठी पुणे पोलिस आज औरंगाबादेत

0
272
छायाचित्र सौजन्यः फेसबुक

पुणेः डॉरमंट अकाऊंट म्हणजेच निष्क्रिय बँक खात्यांचा गोपनीय डेटा चोरून सुमारे सव्वादोनशे कोटी रुपये हडपण्याच्या प्रयत्नात असताना पुण्याच्या सायबर पोलिसांनी औरंगाबादेतील राजेश शर्मा, परमजितसिंग संधू यांच्यासह ११ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरूवात केली आहे. पुण्यात विकत घेतलेला डेटा राजेश शर्मा आणि संधू औरंगाबादेतील एका बड्या उद्योजकास विकणार होते, अशी माहिती असून हा ‘बडा मासा’ शोधण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आज औरंगाबादेत येणार असल्याची माहिती आहे.

निष्क्रिय बँक खात्यांचा गोपनीय डेटा मिळवून त्याच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवण्याच्या या कटाचे मास्टर माइंड सूरतचा वरूण वर्मा आणि पुण्याची अनघा मोडक असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेले निष्क्रिय बँक खात्यांचा डेटा त्यांनी गुजरात, सूरत आणि हैदराबाद येथून मिळवल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यामुळे पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेची पथके तपासासाठी हैदराबाद आणि सूरतमध्ये रवाना झाली आहेत.

अनघा मोडक ही शेअर दलाल आहे. आरोपी वरूण वर्माने निष्क्रिय बँक खात्यांचा गोपनीय डेटा मिळवून दिला होता. चोरलेल्या या डेटाचा वापर करून बँक खातेदारांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्याचा कट अनघा मोडकने आखला. औरंगाबादेतील एएम न्यूजचा संचालक राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू या दोघांना या खात्यातील रक्कम देण्यात येणार होती. त्यासाठी तिने या दोघांकडे अडीच कोटींची मागणी केली. परंतु अडीच कोटी देण्यास या दोघांनी असमर्थता दर्शवल्यानंतर सर्व व्यवहार २५ लाखांत ठरला होता. शर्मा, संधू आणि भाजप चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी हे अनघाच्या संपर्कात होते.

या आरोपींकडे मिळालेला २१६ कोटी रुपयांचा गोपनीय डेटा केवळ ५ बँक खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रीयही आहे. या कटात आणखी काही सूत्रधार आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्या संपर्कात असलेले ‘बडे मासे’ शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आज औरंगाबादेत येणार आहे.

संधू आणि शर्मा या दोघांना या कटासाठी पैसे कुणी पुरवले? ते हा गोपनीय डेटा औरंगाबादेत कुणाला विकणार होते? याचा शोध हे पथक घेणार आहे. दरम्यान, संधू आणि शर्मा यांना पैसे पुरवणारा ‘बडा मासा’ जालना जिल्ह्यातील असल्याची चर्चा होत असून हा ‘बडा मासा’ भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आज पुणे पोलिसांचे पथक औरंगाबादेत आल्यानंतर त्यांच्या तपासातून या चर्चातील सत्यतेवर स्पष्टता येईल आणि या कटातील एक एक पदर उघड होत जातील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा