बँक डेटा चोरीः सव्वादोनशे कोटींचा गोपनीय डेटा विकत घेणारा औरंगाबादचा तो बडा उद्योजक कोण?

0
200
प्रतिकात्मक छायाचित्र.

पुणेः नामांकित बँकातील डोरमंट अकाऊंट म्हणजेच निष्क्रिय खात्यांची गोपनीय माहिती हस्तगत करून त्या खात्यातील रक्कम वळती करून घेण्याच्या आंतरराज्य टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर हा डेटा औरंगाबादेतील एक बडा उद्योजक विकत घेणार होता, अशी माहिती समोर आली असून पोलिस त्या बड्या उद्योजकाचा शोध घेत आहेत.

आयसीआयसीआय, एचडीएफसीसारख्या नामांकित बँकांच्या डोमरंट खात्यांची गोपनीय माहिती मिळवून त्या खात्यातील रकमेचा अपहार करणारी आंतरराज्य टोळी पुणे पोलिसांनी पकडली. या टोळीमध्ये  रविंद्र महादेव माशाळकर (वय ३४), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४), मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय ३७), राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४), रोहन रवींद्र मंकणी (वय ३७), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२), परमजित सिंग संधू (वय ४२) आणि अनघा अनील मोडक (वय ४०) या आरोपींचा समावेश आहे. यातील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे एएम न्यूज या वृत्तवाहिनीशी संबंधित आहेत.

यापैकी रविंद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरूण वर्मा हे चौघे बँक खात्यांचा गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कटामध्ये या कंपनीमधील अन्य व्यक्ती सहभागी आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.

निष्क्रिय बँक खात्यांचा गोपनीय डेटा औरंगाबाद येथील एका बड्या व्यक्तीला पैसे घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांची मध्यस्थ अनघा मोडक होती. २५ लाख रुपये घेऊन  २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा ते विक्री करणार होते. अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक करण्यात आलेल्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून हा डेटा औरंगाबादचा जो बडा उद्योजक विकत घेणार होता, तो लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा