भाजपच्या ‘हिंस्त्र’ राजकारणाला मुरब्बी शरद पवारांचा हाबाडा

0
619

शरद पवारांशी राजकीय मतभेद असूनही त्यांच्या राजकीय चारित्र्याबद्दल आदर असणाऱ्यांची संख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठी आहे. म्हणूनच विरोधकांना संपवण्यासाठी भाजप ईडीच्या ‘हिंस्त्र’ अस्त्राचा वापर करते, या आरोपावर शिक्कामोर्तब झाले. ईडीच्या कार्यालयात जाणार, असे पवारांनी पत्रकारांना कळवले होते, ईडीला किंवा पोलिसांना नव्हे! तरीही तुम्ही येऊ नका, असे ईडीला लेखी कळवून सपशेल लोटांगण घालावे लागले आणि पोलिसांना घरी जाऊन विनवण्या कराव्या लागल्या. यापूर्वी जे कधीच घडले नाही, ते मुरब्बी शरद पवारांनी घडवून दाखवले.

  • प्रमिला सुरेश

वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून विरोधकांना नामोहरम करणे आणि सत्ता हस्तगत करणे ही भाजपची निवडणूक रणनिती राहिली आहे. विखारी प्रचारतंत्र हे त्या रणनितीचे शास्त्र आणि अस्त्र राहिले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचा आणि त्या घोटाळ्याला तेव्हाचे सत्ताधारी काँग्रेस- आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आक्रमक प्रचार भाजपने केला. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ असे प्रश्न विचारणाऱ्या जाहिराती पेरल्या. भाजपच्या या ‘हिंस्त्र’ प्रचारतंत्राला पुरोगामी महाराष्ट्र भुलला आणि राज्यात भाजपचे सरकार आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी वारंवार मागणी करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सत्तेत आल्यानंतर पाच वर्षांत भाजपला ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या, सिंचनाच्या ठोस उपाययोजना करता आल्या. नवे उद्योगधंदे उभे राहिले, ना रोजगारनिर्मिती झाली. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारची हमी देणाऱ्या भाजपच्या राजवटीत जलशिवार योजनेत घोटाळे झाले. सत्तेचा दुरूपयोग करून मंत्र्यांनी जमिनी लाटल्या, नियम मोडून जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक बँकात होणारे वेतन वैयक्तिक स्वार्थासाठी खासगी बँकेमार्फत करण्यास सुरूवात केली. सामाजिक न्याय आणि सुरक्षेला तिलांजली दिली. आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातींच्या अस्मितांना हवा देऊन ध्रुवीकरण केले. हे महाराष्ट्राने पाहिले. लक्षात घेतले. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुरोगामी महाराष्ट्राला काय सांगून मते मागायची? हा भाजपसमोरचा यक्ष प्रश्न होता.

फोडाफोडी करून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपने आपल्या पक्षात घेतले होते. परंतु एवढ्याने निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे लक्षात येत होते. प्रश्नाची उकल होत नव्हती. त्यातच निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका जाहीर करून टाकल्या. आचारसंहिता लागू झाली. मग शरद पवारांना टार्गेट करा आणि निवडणुका जिंका, हेच त्यावरचे जालीम उत्तर आहे, असे भाजपला वाटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशकात समारोप झाला. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत महाराष्ट्रातील भाजप सरकारने किती पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार केला किंवा विकासाचे कोणते नवे प्रकल्प राबवले, किती रोजगार निर्मिती केली हे सांगण्याऐवजी शरद पवारांनाच टार्गेट करून तेव्हाच असे संकेत देऊन टाकले होते.

“निवडणुका म्हटले की आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी होतच असतात. कुणी तरी हरणार आणि कुणी तरी जिंकणारच असतो. परंतु जिंकण्यासाठी आपण कोणत्या पातळीपर्यंत खाली उतरायचे, याचे भानही ठेवले गेले पाहिजे. विखारी प्रचारतंत्र वापरून विरोधकांच्या प्रतिमा हननातच खरी ‘राष्ट्रभक्ती’ शोधणारा भाजप ते ठेवत नाही. ठेवणारही नाही. सुदृढ राजकीय मतभेद आणि संस्कृती हे भूषण मिरवणाऱ्या महाराष्ट्राने आता सावध व्हायला हवे!”

तत्पूर्वी भाजपने केलेल्या फोडाफोडीनंतर बांधबंदिस्ती करण्यासाठी शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा करून महाराष्ट्र पिंजून काढला होता. कार्यकर्त्यांत उत्साह फुंकला होता. जे पक्ष सोडून गेले, ते यापुढे कुठल्याही निवडणुकीत निवडून येणार नाहीत, अशी व्यवस्था करून ठेवल्याचे शरद पवार सांगत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपमध्ये गेलेल्यांचा रक्तदाब वाढत होता. शरद पवारांना कोंडीत पकडून रोखले नाही तर आपली खैर नाही, हे सर्वांच्याच लक्षात येत होते. मग या ‘जाणत्या राजा’ खिंडित गाठण्यासाठी शिखर बँकेच्या घोटाळ्याचे अस्त्र परजण्यात आले. ईडीने शरद पवारांविरुद्ध एफआयआर नोंदवला. माध्यमांच्या हेडलाईन झाल्या. ईडीच्या पिडेमुळे शरद पवार नामोहरम होतील, धास्तावून शांत बसतील अशी या कारवाई मागची अपेक्षा होती. पण ईडीचे किटाळ अंगावर बसल्यावर शांत बसतील ते शरद पवार कसले?

शिखर बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो. त्यामुळे मी नेमका काय गुन्हा केला हे स्वतःच ईडीच्या कार्यालयात जाऊन समजून घेतो, असे पवारांनी जाहीर करून टाकले. तारीख व वेळही सांगितली. त्यातच शरद पवारांच्या राजकारणावर टीका करूनच ज्या एकनाथ खडसेंचे राजकारण बहरले आणि पवारांच्या राजकारणाला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीला लक्ष्य करूनच जे अण्णा हजारे ‘ज्येष्ठ समाजसेवक’ बनले, त्यांनीही या घोटाळ्यात शरद पवारांचे नाव कधीच नव्हते, असे सांगून टाकले. जे सत्य आहे, ते सत्य आहे. उगीच कुणाला गोवणे बरे नव्हे, असे अण्णा हजारेंना म्हणावे लागले. सुडाचे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे सांगत शिवसेनेनेही पवारांची पाठराखण केली. शरद पवारांशी राजकीय मतभेद असूनही त्यांच्या राजकीय चारित्र्याबद्दल आदर असणाऱ्यांची संख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठी आहे. म्हणूनच विरोधकांना संपवण्यासाठी भाजप ईडीच्या ‘हिंस्त्र’ अस्त्राचा वापर करते, या आरोपावर शिक्कामोर्तब झाले. ईडीच्या कार्यालयात जाणार, असे पवारांनी पत्रकारांना कळवले होते, ईडीला किंवा पोलिसांना नव्हे! तरीही तुम्ही येऊ नका, असे ईडीला लेखी कळवून सपशेल लोटांगण घालावे लागले आणि पोलिसांना घरी जाऊन विनवण्या कराव्या लागल्या. यापूर्वी जे कधीच घडले नाही, ते मुरब्बी शरद पवारांनी घडवून दाखवले. भाजपने फेकलेला ईडीचा फास त्यांच्याच गळ्याभोवती घट्ट आवळून दाखवला. किंबहुना सत्तालोलूप भाजप कसे आणि कोणत्या स्तराचे राजकारण करते हेही महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला दाखवून दिले. शरद पवारांना टार्गेट करून भाजप जे काही घडवून राजकीय पोळी भाजून घेऊ पहात होते, ती पोळी पवारांनी अक्षरशः करपून टाकली.

निवडणुका म्हटले की आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी होतच असतात. कुणी तरी हरणार आणि कुणी तरी जिंकणारच असतो. परंतु जिंकण्यासाठी आपण कोणत्या पातळीपर्यंत खाली उतरायचे, याचे भानही ठेवले गेले पाहिजे. विखारी प्रचारतंत्र वापरून विरोधकांच्या प्रतिमा हननातच खरी ‘राष्ट्रभक्ती’ शोधणारा भाजप ते ठेवत नाही. ठेवणारही नाही. सुदृढ राजकीय मतभेद आणि संस्कृती हे भूषण मिरवणाऱ्या महाराष्ट्राने आता सावध व्हायला हवे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा