बांधकाम साहित्य दुपटीने महागले, पण अर्थसहाय्य वाढले नाही; घरकुल योजनेचे लाभार्थी अडचणीत

0
198
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः गेल्या वर्षभरात सिमेंटसह बांधकाम साहित्य दुपटीने महागले असले तरी घरकुल योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत एक छदामही वाढवण्यात न आल्यामुळे राज्यातील घरकुल योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. मिळणारी अनुदानाची रक्कम आणि घरकुलाच्या बांधकामासाठी लागणारा प्रत्यक्ष खर्च याच्यात जवळपास दुपटीची तफावत असल्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करताना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याचे वाढवलेले दर लक्षात घेऊन घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

आपले स्वतःचे पक्के घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे कित्येकांचे हे स्वप्न अधुरेच राहते. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेबरोबरच रमाई आवास योजना ही राज्य पुरस्कृत घरकुल योजनाही राबवली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर, कच्ची घरे असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र बांधकाम साहित्याच्या दरात दुप्पट वाढ झाल्यामुळे ही घरकुले पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या नाकीनऊ येत आहेत.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावावा लागला. लॉकडाऊनच्या आधी राज्यातील सिमेंट, वीट, रेती, स्टीलचे भाव आणि सध्याचे भाव याच्यात जवळपास दुपटीचा फरक झाला आहे. लॉकडाऊनच्या आधी स्टीलचे भाव ३६ रुपये किलोवर स्थिर होते. लॉकडाऊननंतर ते ५५ ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. लॉकडाऊनआधी १५० ते १७० रुपयांना असलेली सिमेंटची गोणी आता ४०० ते ४२० रुपयांवर पोहोचली आहे. बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे बांधकामाचा खर्च आता किमान १,१५० रुपये चौरसफूट पडू लागला आहे.

सिमेंट, स्टील, वीट, रेती आदी बांधकाम साहित्याच्या किंमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही घरकुल योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम मात्र एक रुपयानेही वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे अवघड होऊन बसले आहे. काही जणांना तर कर्जबाजारी होऊन घरकुले पूर्ण करावी लागत आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्याचे वाढीव दर लक्षात घेता घरकुल योजनेच्या अर्थसहाय्याच्या रकमेतही वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा